परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अखंड अनुसंधानात असलेले आणि बहुविकलांग असूनही सर्वांच्या साधनेला सूक्ष्मातून बळ देणारे सनातनचे ३२ वे संत पू. सौरभ संजय जोशी (वय २६ वर्षे) !
चैत्र कृष्ण अष्टमी (२३.४.२०२२) या दिवशी पू. सौरभ जोशी यांचा २६ वा वाढदिवस आहे. मागील वर्षी पू. सौरभ जोशी यांच्या २५ व्या वाढदिवसाच्या दिवशी (४.५.२०२१) डहाणू, जिल्हा पालघर येथील त्यांच्या आत्याचे यजमान श्री. कृष्णकांत मोरेश्वर राईलकर यांनी पू. सौरभदादा यांच्या चरणी वाहिलेली काव्यरूपी भावसुमनांजली येथे दिली आहे.
पू. सौरभ जोशी यांना २६ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराकडून कृतज्ञतापूर्वक नमस्कार !
धन्य धन्य सौरभदादा । धन्य धन्य सौरभदादा ।
आज आपला जन्मदिवस । धन्य ते माता आणि पिता ।
धन्य ती वसुंधरा माता ।। धृ. ।।
परम पूज्यांच्या (टीप १) आशीर्वादे । जीवनाचे सार्थक केले ।
सततच्या नामस्मरणे । जीवनच उद्धरिले ।
धन्य ते साधक-भक्त । ज्यांना देता अनुभूती आपण ।। १ ।।
नेहमी स्वानंदात असती । काळजी नसे प्रपंचाची ।
होईल ते होणार ना । जाईल ते जाणार ना ।
तमा नसे देहधर्माची । जपत नसे आरोग्यासी ।। २ ।।
देहातीत रहाती पूर्ण । जरी झाल्या अस्थी विदीर्ण ।
चिंता (पर्वा) भक्त-साधकांची । विचारपूस करिती त्यांची ।
परम पूज्यांनाच स्मरूनिया । वाचासिद्धी प्रकट करती ।। ३ ।।
वाढ तुमची दिवसागणिक । आध्यात्मिक पातळीत ।
सहज आपण जाऊन बसलात । संतांच्या मांदियाळीत ।
मी पामर काय शुभेच्छा देणार । सूर्यालाच झालो ओवाळता (टीप २) ।। ४ ।।
हिंदु राष्ट्राची तळमळ । परम पूज्यांना कळकळ (आस्था) (टीप ३) ।
सत्कार्यास वाहून घेती । सत्यालाच अवरोध असती ।
ईश्वरी राज्याचा संकेत । आशिष द्या हो आता हाच ।। ५ ।।
धन्य धन्य सौरभदादा । आज आपला जन्मदिवस ।
धन्य ते माता आणि पिता । धन्य ती वसुंधरा माता ।। धृ. ।।
टीप १ – परात्पर गुरु डॉ. आठवले
टीप २ – पू. सौरभदादा यांचे साधनेचे तेज सूर्याप्रमाणे आहे. त्यामुळे त्यांना ओवाळणे, म्हणजे सूर्यालाच ओवाळण्यासारखे आहे.
टीप ३ – परात्पर गुरु डॉ. आठवले यांना हिंदु राष्ट्राची तळमळ असल्याने ते हे कार्य मनापासून करत आहेत.
– श्री. कृष्णकांत मोरेश्वर राईलकर (पू. सौरभदादा यांच्या आत्याचे यजमान) डहाणू, जिल्हा पालघर
गुरुदेवांचे प्रतिरूप भासणारे पू. सौरभ संजय जोशी !
सनातनचे सांगली येथील साधक श्री. रवींद्र कुंभार अन् त्यांचे कुटुंबीय यांनी पू. सौरभ जोशी यांच्या चरणी २५ व्या वाढदिवसानिमित्त व्यक्त केलेले कृतज्ञतापुष्प येथे दिले आहे.
पू. सौरभ जोशी यांच्या वाढदिवसानिमित्त गुलाबजाम करून त्याचा नैवेद्य परात्पर गुरु डॉ. आठवले आणि पू. सौरभ जोशी यांना दाखवणे
‘पू. सौरभ जोशी यांचा चैत्र कृष्ण अष्टमी (४.५.२०२१) या दिवशी २५ वा वाढदिवस होता. त्या वेळी तासगाव (जिल्हा सांगली) येथील साधक श्री. रवींद्र कुंभार आणि त्यांचे कुटुंबीय यांनी घरी पू. सौरभदादांच्या वाढदिवसानिमित्त गुलाबजाम केले होते. त्यांनी त्या गुलाबजामचा परात्पर गुरु डॉ. आठवले आणि पू. सौरभदादा यांना नैवेद्य दाखवला. नंतर त्यांनी त्याचे छायाचित्र काढून भ्रमणभाषवर पाठवले आणि समवेत कृतज्ञतापत्रही पाठवले. विशेष म्हणजे रामनाथी आश्रमातही पू. सौरभदादांच्या वाढदिवसानिमित्त गोड म्हणून गुलाबजामच आणले होते. – संकलक |
१. श्री. रवींद्र कुंभार यांनी पू. सौरभ जोशी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने लिहिलेले कृतज्ञतापत्र
१ अ. पू. सौरभदादांच्या चरणी नमस्कार सांगून परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करणे : पू. सौरभदादांच्या चरणी आम्हा सर्वांचा साष्टांग दंडवत ! आज पू. सौरभदादांचा वाढदिवस ! आज गुरुदेवांनी आम्हाला पू. सौरभदादांची, म्हणजे संतांची सेवा करण्याचा लाभ दिला. त्यासाठी गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता ! पू. सौरभदादा हे स्थूलदेहाने रामनाथी आश्रमात असले, तरी सूक्ष्मदेहाने ते सदैव आमच्या जवळच असतात.
१ आ. पू. सौरभ जोशी यांचे स्मरण करताच नकारात्मक असणारे मन सकारात्मकता आणि आनंद यांनी भरून जाणे : आताच्या या आपत्काळात (कोरोना महामारीच्या काळात) मन नकारात्मक झाल्यावर पू. सौरभदादांचे स्मरण करताच मन सकारात्मकता आणि आनंद यांनी भरून जाते. पू. सौरभदादांमुळेच या आपत्काळात लढण्यासाठी आम्हाला बळ मिळत आहे. गुरुमाऊलीच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) कृपेने आम्हा सर्वांना पू. सौरभदादांचा सूक्ष्मातून सत्संग लाभतो. आम्ही सर्व जण देहाने घरी असलो, तरी सूक्ष्मदेहाने रामनाथी आश्रमात पू. सौरभदादा आणि गुरुमाऊली यांच्या सहवासातच आहोत.
१ इ. ‘पू. सौरभदादा परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे रूप आहेत’, असे वाटणे : आम्हाला सूक्ष्म जगताची अनुभूती गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) कृपेने अनुभवता येत आहे. सूक्ष्मातून पू. सौरभदादांशी बोलणे आणि त्यांची सेवा करणे यांतून आम्हाला पुष्कळ आनंद जाणवतो. ‘पू. सौरभदादा म्हणजे गुरुदेवांचेच रूप आहे’, असे आम्हाला वाटते.
पू. सौरभदादांची आठवण आल्यावर श्री. संजय जोशी आणि सौ. प्राजक्ता जोशी (पू. सौरभदादांचे आई-वडील) यांच्यामुळे आम्हाला पू. सौरभदादांशी सहजतेने संवाद साधता येतो. त्यामुळे काका आणि काकू यांनाही साष्टांग दंडवत ! गुरुदेवांच्या कृपेने आम्हाला जे अनुभवता आले, ते त्यांच्याच कृपेने लिहून देता आले. गुरुदेव आणि पू. सौरभदादा यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !
– श्री. रवींद्र शामराव कुंभार, सौ. संगीता रवींद्र कुंभार, कु. प्रज्ञा रवींद्र कुंभार आणि कु. प्रीती रवींद्र कुंभार, तासगाव, जिल्हा सांगली.
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात. • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |