अणूबाँबच्या स्फोटाचे दुष्परिणाम !
१. वातावरणात होणारे दुष्परिणाम
अ. ज्या ठिकाणी १० किलो टनचा ‘अणूबाँब’ पडतो, तेथील सुमारे ०.८ चौरस किलोमीटर क्षेत्रातील सर्व गोष्टी क्षणार्धात जळून त्यांची वाफ होते.
आ. अणूबाँबच्या स्फोटामुळे हवेचा प्रचंड दाब (१.७६ किलो/चौ.से.मी.) निर्माण होतो आणि ५१० किलोमीटर प्रतिघंटा वेगापेक्षा अधिक वेगाचे वादळ निर्माण होते. या वेळी भूमीला प्रचंड हादरे बसून ३ चौरस किलोमीटरपर्यंतचे क्षेत्र उद्ध्वस्त होऊ शकते, तर ३० चौरस किलोमीटर क्षेत्रापर्यंत जीवित आणि वित्त हानी होऊ शकते. ही हानी त्या अणूबाँबच्या क्षमतेनुसार अल्प-अधिक असते.
इ. अणूबाँब पडलेल्या ठिकाणी अनेक वर्षे वनस्पतीही उगवत नाही.
२. मानवी जीवनावरील दुष्परिणाम
अ. अणूबाँबच्या स्फोटामुळे ३ किलोमीटरच्या अलीकडील क्षेत्रातील सर्व ज्वलनशील पदार्थ पेट घेतात आणि प्रचंड धूर निर्माण होऊन माणसे गुदमरतात. या वेळी ऑक्सिजनची न्यूनता निर्माण होऊन श्वसनात अडथळे येतात. यात ५० टक्के लोक संपूर्णतः घायाळ आणि १५ टक्के लोक मृत्यूमुखी पडतात.
आ. काही जणांना तात्पुरते किंवा काही जणांना कायमचे अंधत्वही येऊ शकते.
इ. अणूबाँबच्या स्फोटानंतर त्याची किरणोत्सर्गी धूळ खाली येते, तेव्हा होणारा किरणोत्सर्ग शरिरातील पेशी नष्ट करू शकतो. मळमळ, उलट्या, जुलाब, कर्करोग इत्यादी व्यधी होऊ शकतात. स्फोटानंतर काही मिनिटे किंवा काही घंटे किंवा काही दिवस किरणोत्सर्ग उच्च पातळीवर म्हणजे सर्वाधिक असू शकतो आणि नंतर किरणोत्सर्ग अल्प म्हणजे विरळ होत जातो. तरीही त्याचा परिणाम अनेक वर्षे दृश्य स्वरूपात दिसून येऊ शकतो.
दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेने जपानमधील हिरोशिमा आणि नागासाकी येथे अणूबाँब टाकल्याने त्याच्या स्फोटानंतर झालेल्या किरणोत्सर्गाचा परिणाम पुढील अनेक वर्षे दिसून येत होता. तेथे जन्माला येणाऱ्या मुलांवरही त्याचे परिणाम दिसून आले. ती मुले शारीरिकदृष्ट्या विकलांग किंवा रोगग्रस्त असत.
ई. अणूबाँब टाकण्यात आलेल्या ठिकाणी काही दशकांपर्यंत जनजीवन नष्ट होते.
३. अन्य दुष्परिणाम
अणूबाँबच्या क्षमतेनुसार त्याच्या स्फोटापासून कित्येक किलोमीटर अंतरावरील विद्युत् उपकरणे, तसेच इलेक्ट्रॉनिक उपकरणे यांची हानी होऊ शकते. त्यामुळे पुढे तात्पुरते व्यत्यय किंवा अडथळे येऊ शकतात.
(संदर्भ : माय करियर, संकेतस्थळ)