गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा समाजाच्या भावना दुखावल्या प्रकरणी पुण्यात राष्ट्रवादीकडून पोलिसात तक्रार !
पुणे – अधिवक्ता गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा समाजाच्या भावना दुखावल्या असून या पती पत्नी यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्याची मागणी राष्ट्रवादीने केली आहे. तक्रार अर्ज पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसने शिवाजीनगर पोलिसांना दिला आहे. मराठा आरक्षणाच्या आंदोलनादरम्यान आक्षेपार्ह विधानामुळे सदावर्ते यांच्या विरोधात सातारा आणि त्यानंतर कोल्हापूरमध्ये तक्रार प्रविष्ट करण्यात आली होती, तसेच सदावर्ते यांच्यावर मुंबई, पुणे, बीड, सोलापूर अशा अनेक ठिकाणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात सदावर्ते यांच्या विरोधात ९ सप्टेंबर २०२० या दिवशी गुन्हा नोंद करण्यात आला होता. या गुन्ह्यात त्यांना पुणे पोलीस अटक करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
यावर सदावर्ते यांनी सांगितले की, माझी आक्षेपार्ह वक्तव्ये म्हणजे माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे आहेत. त्यांच्याकडे व्हिडिओ आहेत. ते पाहू शकतात. ते दंगे होतील असे कारण देत आहेत. मग ते आतापर्यंत का झाले नाहीत ? असा प्रश्न त्यांनी या वेळी उपस्थित केला.