सिंधुदुर्ग जिल्हा ब्राह्मण समाजाच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांचा निषेध
अमोल मिटकरी यांनी कन्यादानाविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे प्रकरण
सिंधुदुर्ग – सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसंवाद यात्रेच्या कार्यक्रमात आमदार अमोल मिटकरी यांनी ब्राह्मण समाज, तसेच हिंदु धर्मातील धार्मिक संस्कार यांविषयी बेताल वक्तव्य केली आहेत. त्यामुळे आम्ही आमदार मिटकरी यांचा तीव्र निषेध करत असून त्यांच्या विरुद्ध फौजदारी गुन्हा नोंद करावा, अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा ब्राह्मण समाजाच्या वतीने प्रशासनाकडे करण्यात आली आहे. याविषयी ओरोस, कणकवली आणि सावंतवाडी येथे प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
ओरोस येथे आमदार मिटकरी यांना निवेदन देण्यापासून पोलिसांनी रोखले !
ओरोस – आमदार मिटकरी यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानाचा, तसेच आमदार मिटकरी यांचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समस्त ब्राह्मण समाजाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमून निषेध केला. या वेळी ब्राह्मण समाजाच्या प्रतिनिधींनी आमदार मिटकरी यांच्या निषेधार्थ जोरदार घोषणा दिल्या.
आमदार मिटकरी हे जिल्ह्याच्या दौर्यावर आहेत. त्यांना ब्राह्मण समाजाच्या वतीने निषेधाचे निवेदन देण्यात येणार होते; मात्र आमदार मिटकरी हे निवेदन न स्वीकारता नियोजित मार्गावरून जाऊ लागले. या वेळी कार्यकर्त्यांनी निवेदन देण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले. पोलिसांच्या या भूमिकेविषयी ब्राह्मण समाजाच्या प्रतिनिधींनी तीव्र अप्रसन्नता व्यक्त केली.
सिंधुदुर्ग जिल्हा ब्राह्मण समाजाचे जयेश चिंचळकर, लक्ष्मण बाकरे, विवेक गोखले, मंजुनाथ फडके, आशुतोष मुंडले, हर्षद कशाळीकर आणि सदाशिव सादले आदी या वेळी उपस्थित होते.
कणकवली येथे तहसील कार्यालयात निवेदन देत कारवाईची मागणी
कणकवली – आमदार मिटकरी यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा नोंद करावा, अशी मागणी महाराष्ट्र ब्राह्मण मंडळाच्या कणकवली शाखेच्या वतीने कणकवलीचे नायब तहसीलदार एस्.व्ही. राठोड यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
या निवेदनात म्हटले आहे की, आमदार अमोल रामकृष्ण मिटकरी यांच्या विरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम ३४, १५३, १६६, २६८,,२९५,,२९५, २९८, ५०४,,५०५ अन्वये दखलपात्र आणि अजामीनपात्र गुन्हा नोंद करण्यात यावा. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या महाराष्ट्रातील तथाकथित पुरोगामी म्हणून ओळखल्या जाणार्या राजकीय पक्षाचे विधान परिषदेतील प्रतिनिधित्व आमदार मिटकरी करतात. इस्लामपूर येथील पक्षाच्या कार्यक्रमात सहस्रो लोकांच्या समोर त्यांनी ब्राह्मण समाजाविषयी, तसेच एकूण हिंदु धर्मातील धार्मिक संस्काराविषयी अत्यंत प्रक्षोभक आणि जातीयवादी तेढ निर्माण करणारी विधाने केली आहेत. अमोल मिटकरी यांनी या आधीही त्यांच्या वाचाळ वाणीतून भारतियांच्या भावना दुखावण्याचे आणि विविध धर्म अन् जाती यांविषयी चुकीची वक्तव्ये करून भारतीय समाजात तेढ आणि दुजाभाव निर्माण करण्याचे प्रयत्न केले आहेत.
आमदार मिटकरी यांनी क्षमा न मागितल्यास आंदोलन करण्याची चेतावणी
सावंतवाडी – आमदार अमोल मिटकरी यांचा महाराष्ट्र ब्राह्मण मंडळ, सिंधुदुर्ग शाखेच्या वतीने निषेध करण्यात आला. मिटकरी यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. या विषयीचे निवेदन मंडळाच्या वतीने येथील प्रांताधिकारी कार्यालयात देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, आमदार मिटकरी यांनी ‘कन्यादान’ या विधीवरच प्रश्नचिन्ह उभे केले. त्यामुळे समाजात अपसमज पसरून धार्मिक तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मिटकरी यांनी क्षमा मागावी, अन्यथा सनदशीर आणि कायदेशीर मार्गाने आंदोलन उभे केले जाईल.
या वेळी श्री देव परशुराम मंदिर समितीचे अध्यक्ष बाळ पुराणिक, महाराष्ट्र ब्राह्मण मंडळाचे जिल्हाध्यक्ष राजाराम चिपळूणकर, तालुका कार्यवाह अंजली नातू, शिवानंद भिडे आणि गुरुदास देवस्थळी आदी उपस्थित होते.