देशाला युद्धसज्ज करण्यासाठी सैनिकी शिक्षण अपरिहार्य !
शांततेच्या काळात नागरिकांची मानसिकता युद्धाची नसते किंवा ते तसा विचारही करत नसतात. इस्रायलसारख्या देशांतील नागरिकांना प्रत्येक दिवस युद्धाचा असतो. त्यामुळे ते युद्धासाठी सिद्धच असतात. त्यांना सैनिकी शिक्षण घेणे बंधनकारक आहे. केवळ पुरुषच नाही, तर महिलांनाही ते घ्यावे लागते. त्यांच्यावर राष्ट्रभक्तीचा संस्कार जन्मापासूनच झालेला असतो. त्यामुळे इस्रायलसारखा देश गेली ७० वर्षे शेजारील इस्लामी राष्ट्रांना तोंड देत अभिमानाने उभा आहे आणि त्याचा आदर्श जगातील सर्वच देश घेत असतात.
‘प्रत्येक नागरिकाला सैनिकी शिक्षण देण्यात यावे’, अशी मागणी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केली होती. त्यानंतरही अनेक प्रखर राष्ट्रभक्तांनी ती मांडली; मात्र तथाकथित अहिंसावादी तत्कालीन काँग्रेसी शासनकर्त्यांनी ती स्वीकारली नाही. मुळात हिंदु धर्मात सैनिकी शिक्षणालाही तितकेच महत्त्व आहे. हिंदु धर्माने एक वर्णच सैन्यासाठी निर्माण केलेला आहे. तरीही अन्य वर्णियांनी ‘राष्ट्र आणि धर्म यांसाठी हातात शस्त्र घेणे, हे आपले कर्तव्य आहे’, हे जाणून वेळोवेळी हाती शस्त्र घेतले आहे. भारताच्या सहस्रो वर्षांच्या इतिहासात शक, हुण, मोगल, इंग्रज आदींनी आक्रमणे केली आणि भारताला गुलाम बनवले. ते पहाता स्वातंत्र्यानंतर भारतियांना युद्धसज्ज करण्याची आवश्यकता आहे. मोदी शासनाने नुकतीच ३ वर्षे सैन्यभरतीची सक्ती केली आहे, हा अतिशय स्वागतार्ह निर्णय आहे.
– श्री. प्रशांत कोयंडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.