भारतियांची, युद्धजन्य स्थितीला सामोरे जाण्याची सिद्धता आहे का ?
रशिया सर्वदृष्ट्या शक्तीशाली आहे; पण युक्रेनची स्थिती आरंभीपासूनच कमकुवत असल्याचे स्पष्ट असूनही अनेक प्रसंगांतून ‘युक्रेनी जनतेचा युद्धातील उत्स्फूर्त सहभाग’ हा भाग शिकण्यासारखा आहे. झेलेंस्की यांनी आवाहन केल्यावर कधीही हातात शस्त्र न धरलेल्या जनतेने हातात शस्त्र घेऊन ते चालवण्याचे प्रशिक्षण घेतले. युक्रेनची ‘मिस युनिव्हर्स’ही (सौंदर्यस्पर्धेतील विजयी युवती) हातात मोठे शस्त्र घेऊन रस्त्यावर उतरली. उद्या भारतात अशी वेळ आलीच, तर किती अभिनेत्रींमध्ये हे धैर्य येईल ? एक युक्रेनी महिला रस्त्यावर असलेल्या रशियाच्या रणगाड्यात जाऊन बसली आणि तिने प्रयत्न करून तो चालवायचा कसा, ते शिकून त्याचा व्हिडिओ प्रसारित केला. युक्रेनमधून प्रसारित झालेले असे काही व्हिडिओ हे युक्रेनी जनतेचे देशप्रेम दर्शवतात. युद्धकाळात या नागरिकांनी देशाला उत्स्फूर्तपणे पाठिंबा दिला आहे. भारतात युद्ध चालू झाल्यावर ‘देशविरोधकांनी त्यांची तोंडे बंद ठेवली, तरी पुष्कळ झाले’, अशी स्थिती आहे. युद्धकाळात अनेक गुणांसह ‘आज्ञापालन’ हा गुण सर्वांत महत्त्वाचा ठरतो. आपल्याकडे पुराचे पाणी भरल्यावरही लोक घर सोडायला सिद्ध नसतात, तर युद्धकाळात कसे करणार ? ‘तिसरे महायुद्ध चालू होण्याचे दिवस जवळ आले आहेत’, असे अनेक भारतियांना सांगूनही खरे वाटत नव्हते. आता चालू झालेल्या युद्धाचे ढग भारतापर्यंत यायला अधिक काळ लागणार नाही. आतापर्यंत लाखो युक्रेनी नागरिकांनी युक्रेन सोडले आहे. उद्या तिसऱ्या महायुद्धाचा वणवा वाढला, तर भारतियांची विविध प्रकारची पूर्वसिद्धता असणे आवश्यक आहे. त्यासाठी भारतियांनी वैयक्तिक स्तरावर काय सिद्धता केली आहे ? युद्धात सर्वाधिक लोक हे इमारतीवर बाँब पडल्यावर लागलेल्या आगीत मरत आहेत. भारतात किती जणांना अग्नीशमन प्रशिक्षण येते ? किती जणांना प्रथमोपचार करता येतात ? युद्ध अधिक काळ चालले, तर धान्य, औषधे, अत्यावश्यक गोष्टी यांचा साठा करण्याविषयी काही पूर्वसिद्धतेचा अभ्यास झाला आहे का ?, याचा विचार करणे आवश्यक आहे.
– सौ. रूपाली वर्तक, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२१.४.२०२२)