भारतीय चिकित्सा पद्धतींना प्रोत्साहन देण्यासाठी ‘आयुष मार्क’चे उद्घाटन ! – पंतप्रधान मोदी
विदेशी लोकांना भारतीय उपचारपद्धतींनी उपचार करता येण्यासाठी ‘आयुष व्हिसा’ला आरंभ !
(‘आयुष’ म्हणजे आयुर्वेद, योग, निसर्गोपचार, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी या चिकित्सा पद्धती !)
गांधीनगर (गुजरात) – भारतातील प्राचीन चिकित्सा पद्धतींना प्रोत्साहन मिळावे, यासाठी आयुषच्या गुणवत्तापूर्ण उत्पादनांना ‘आयुष मार्क’ने चिन्हित केले जाणार आहे. यासमवेतच विदेशी लोकांना भारतात येऊन या चिकित्सा पद्धतींद्वारे उपचार घेता येण्यासाठी ‘आयुष व्हिसा’ नावाच्या व्हिसाचा नवा प्रकार चालू करण्यात आल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. गांधीनगर येथे ३ दिवसांची ‘आयुष गुंतवणूक आणि नवीनता परिषद’ आयोजित करण्यात आली आहे. त्याच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान बोलत होते. या वेळी मॉरिशसचे पंतप्रधान प्रवींण्द जुग्नौथ आणि जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख डॉ. तेद्रोस गेब्रियेसस उपस्थित होते.
मोदी पुढे म्हणाले की…
१. ‘आयुष मार्क’ असलेली उत्पादने जागतिक समुदायाला आश्वस्त करतील की, ते गुणवत्तायुक्त उत्पादने वापरत आहेत.
२. ‘हील इन इंडिया’ (भारतात येऊन निरोगी व्हा) ही मोहीम या दशकात सर्वदूर प्रसिद्ध होईल.
३. आयुर्वेद, युनानी, सिद्ध आदींवर आधारित उपचार केंद्रे पुष्कळ प्रसिद्ध होऊ शकतात.
Speaking at the Global AYUSH & Innovation Summit in Gandhinagar. https://t.co/RMhuRNRpBx
— Narendra Modi (@narendramodi) April 20, 2022
४. आयुष क्षेत्रात गुंतवणूक आणि नावीन्यता निर्माण करण्याच्या अमर्याद संधी आहेत.
५. वर्ष २०१४ च्या आधी हे क्षेत्र ३ बिलियन डॉलर्सची उलाढाल होती. ती ६ पटींनी वाढली असून आज या क्षेत्रात १८ बिलियन डॉलर्सची उलाढाल होत आहे.
६. २१ व्या शतकात भारताने त्याचे ज्ञान, अनुभव आणि माहिती यांचा जगाला लाभ करून देण्याची आवश्यकता आहे. त्यासाठीच ही पावले उचलण्यात आली आहेत.
संपादकीय भूमिकाआयुर्वेद अन् अन्य चिकित्सा पद्धतींना जागतिक प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणारे पंतप्रधान मोदी यांचे अभिनंदन ! भारताच्या स्वातंत्र्यापासून या पद्धतींना अशा प्रकारे प्रोत्साहन न मिळणे हे देशावर सर्वाधिक काळ सत्तेत असणार्या तत्कालीन काँग्रेस सरकारला लज्जास्पद ! |