राज्यातील १८ मंत्र्यांवर कोरोनाच्या कालावधीत झालेल्या उपचारांचा १ कोटी ३९ लाख रुपयांचा व्यय सरकारच्या तिजोरीतून !

सरकारी तिजोरीतून व्यय होणे म्हणजे जनतेच्या कराचा पैसाच उधळणे नव्हे का ?

मुंबई – कोरोनाच्या कालावधीत राज्यातील १८ मंत्र्यांवर विविध रुग्णालयांत केलेल्या औषधोपचारांचा १ कोटी ३९ लाख रुपयांचा व्यय सरकारच्या तिजोरीतून करण्यात आला आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वाधिक ९ मंत्र्यांचा समावेश आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचाही यामध्ये समावेश आहे. तसेच काँग्रेसच्या ६, तर शिवसेनेच्या ३ मंत्र्यांचा समावेश आहे. ‘झी २४ तास’ या वृत्तवाहिनीवरून हे वृत्त प्रसारित करण्यात आले.

१. ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत  यांच्या उपचारांवर १७ लाख ६३ सहस्र रुपये, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ १४ लाख ५६ सहस्र, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार १२ लाख ५६ सहस्र, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड ११ लाख ७६ सहस्र, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ ९ लाख ३ सहस्र, पशूसंवर्धनमंत्री सुनील केदार ८ लाख ७१ सहस्र, जलसंपदामंत्री जयंत पाटील ७ लाख ३० सहस्र, उद्योगमंत्री सुभाष देसाई ६ लाख ९७ सहस्र आणि परिवहनमंत्री अनिल परब यांच्या उपचारावर ६ लाख ७९ सहस्र रुपये खर्च करण्यात आले.

२. सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण, पाणीपुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांच्यावरील उपचारांवर ९ लाख रुपयांचा व्यय सरकारी तिजोरीतून करण्यात आला.

३. आदिवासी विकासमंत्री के. सी. पाडवी यांच्या उपचारांवर १ लाख रुपये, तर राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे, ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी ५० सहस्र रुपयांपर्यंतचा व्यय सरकारी तिजोरीतून करण्यात आला. मंत्र्यांनी बॉम्बे, लिलावती, ब्रीच कँण्डी, जसलोक, फोर्टिस हॉस्पिटल, अवंती हॉस्पिटल, ग्लोबल हॉस्पिटल आणि अनिदीप या रुग्णालयांमध्ये उपचार घेतला.

याविषयी प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलतांना छगन भुजबळ म्हणाले, कोरोना किंवा अन्य कोणत्याही विकारासाठी सर्व आमदारांना सरकारने तशी सोय उपलब्ध करून दिली असेल, तर तिचा लाभ लोक घेतात. तुम्ही केवळ मंत्र्यांचे काढता; परंतु सर्व आमदारांचे काढले, तर त्यात भाजप आणि अन्य पक्षांचेही सापडतील.