सोलापूर येथील ‘हिंदु एकता दिंडी’ला मोठ्या संख्येने उपस्थित राहून यशस्वी करण्याचा धर्मप्रेमींचा निर्धार !

ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वरांच्या मंदिरात नियोजन बैठक

बैठकीला उपस्थित धर्मप्रेमी आणि बैठक घेतांना हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते

सोलापूर, २१ एप्रिल (वार्ता.) – सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त येथे १५ मे या दिवशी सनातन संस्था आणि समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने ‘हिंदु एकता दिंडी’चे आयोजन करण्यात आले आहे. या दिंडीमध्ये स्वत:चे कुटुंब आणि मित्रपरिवार यांच्यासह मोठ्या संख्येने उपस्थित रहाण्याचे आवाहन सनातन संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या बैठकीत करण्यात आले. २० एप्रिल या दिवशी येथील ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वरांच्या मंदिरात ही बैठक पार पडली. या वेळी हिंदु एकता दिंडीचा उद्देश आणि तिचे स्वरूप हिंदु जनजागृती समितीचे श्री. विक्रम घोडके, श्रीमती अलका व्हनमारे आणि कु. वर्षा जेवळे यांनी स्पष्ट केले. या वेळी उपस्थित धर्मप्रेमींनी दिंडीला मोठ्या संख्येने उपस्थित राहून ती यशस्वी करण्याचा निर्धार केला.

बैठकीमध्ये सर्वांचा उत्साह मोठ्या प्रमाणात वाढला होता. दिंडीमध्ये पाण्याची व्यवस्था करणे, ध्वनीक्षेपक यंत्रणा उपलब्ध करून देणे, चारचाकी वाहन उपलब्ध करून देणे, भगवे ध्वज उपलब्ध करून देणे यांसारख्या विविध कृतींचे दायित्व धर्मप्रेमींनी उत्स्फूर्तपणे स्वत:कडे घेतले. हिंदु जनजागृती समितीचे ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. राजन बुणगे, श्री. विनोद रसाळ यांच्यासह अनेक धर्मप्रेमी बैठकीला उपस्थित होते.

विशेष

बैठकीमध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अद्वितीय कार्य आणि हनुमान जयंतीनिमित्त भारतभरात हिंदुत्वनिष्ठांनी केलेले ‘गदापूजन’ यांविषयीची ध्वनीचित्रफीत दाखवण्यात आली.