पुण्यात ब्राह्मण महासंघाकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयासमोर निषेध आंदोलन !
मिटकरी यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे प्रकरण
पुणे – राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी ‘कन्यादान’ या विधीची, तसेच लग्नविधी, पूजाकार्य करणारे पुरोहित यांची खिल्ली उडवली. मिटकरींनी ब्राह्मण समाजाच्या भावना दुखावल्यामुळे ब्राह्मण समाज आक्रमक झाला. त्यामुळे पुण्यात ब्राह्मण महासंघाकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयासमोर अमोल मिटकरी यांच्या विधानाचा निषेध करण्यासाठी २१ एप्रिल या दिवशी आंदोलन केले. या विधानामुळे ब्राह्मण समाजाच्या भावना दुखावल्या गेल्याचे सांगत ‘मिटकरींनी क्षमा मागावी’, अशी मागणी करण्यात आली आहे.
सौजन्य : ABP MAZA
या विरोधाविषयी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी ‘मी एका गावात कन्यादान चालू असतांना तिथे विरोध केला. कन्या ही काही दान करण्याची गोष्ट नाही. कन्यादान करत असतांना स्थानिक महाराजांनी जो मंत्र उच्चार केला, त्याचा अर्थ केवळ समजावून सांगितला’, असे स्पष्टीकरण दिले. मिटकरी यांनी ‘यासंदर्भात क्षमा मागणार नाही’, असे म्हटले आहे.
अमोल मिटकरी यांच्या वक्तव्याप्रकरणी ब्राह्मण समाजाकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. मिटकरी यांनी मात्र ‘माझ्या वक्तव्याला जातीय रंग दिला जात आहे. मी क्षमा मागणार नाही’, अशी भूमिका मांडली आहे.
ब्राह्मण समाजाविषयी झालेल्या वक्तव्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करतो ! – जयंत पाटील, जलसंपदामंत्री
अमोल मिटकरी यांच्या वक्तव्यानंतर असे वक्तव्य न करण्याविषयी मी त्यांना भ्रमणभाषवरून संदेश पाठवला होता. माझ्या व्यासपिठावर असे भाष्य झाले, त्याविषयी मी दिलगिरी व्यक्त करतो. अमोल मिटकरी यांच्या बोलण्यात ब्राह्मणाचा उल्लेख नव्हता. अमोल मिटकरी यांचे वक्तव्य हे वैयक्तिक आहे; मात्र त्यांनी हे वक्तव्य माझ्या व्यासपिठावरून केले, त्याविषयी मी दिलगिरी व्यक्त करतो.
हिंदु धर्माचे विडंबन करणाऱ्या अमोल मिटकरी यांचा निषेध ! – आनंद दवे, ब्राह्मण महासंघ
‘मी माझी बायको तुम्हाला देत आहे’, असा मंत्राचा अर्थ होतो का ? शेकडो वर्षांपासून हा मंत्रोपचार केला जात आहे. इतके दिवस तुमच्यापैकी कुणाला सुचले नाही का ? की हा मंत्र चुकीच्या पद्धतीने बोलला जात आहे ते ! हा मंत्र नाही, तो लग्नात बोलला जात नाही. तुम्हीच चुकीचा मंत्र सांगत असून तो चुकीच्या पद्धतीने मांडत आहात. तुम्ही पौराहित्य केले आहे का ? हा हिंदु धर्माचा अपमान असून फक्त ब्राह्मण समाज पौरोहित्य करत नाही. माळी, लिंगायत इतर समाजही पौरोहित्य करतात. हा त्या सगळ्यांचा अपमान आहे. हा हिंदु धर्मियांचा अपमान आहे. तो आम्ही सहन करणार नाही. आज आम्ही कार्यालयात घुसलो उद्या घराघरात घुसू. स्पष्टीकरण मागणारे तुम्ही कोण ?
अमोल मिटकरी हे मूर्ख आहेत. ‘ते ब्राह्मण समाजाच्या विरोधात बोलले आहेत’, असे आम्ही म्हणतच नाही. त्यांनी कोणत्याही समाजाचे नाव घेतलेले नव्हते; पण त्यांनी हिंदु धर्मातील एक मंत्र चुकीच्या पद्धतीने वापरला, यावर आमचा आक्षेप आहे. ‘मी माझी बायको पुरोहिताला देत आहे’, असे वक्तव्य त्यांनी केले आहे, हे चुकीचे आहे. हेच विधान ते नमाजच्या विरोधात बोलू शकतील का ? हिंदु धर्माचे त्यांनी विडंबन केल्यामुळे आम्ही त्यांचा निषेध करत आहोत.
संपादकीय भूमिका
|