राष्ट्रवादी काँग्रेसची तुकडे तुकडे टोळी शरद पवार यांनी आवरावी !
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे आवाहन
मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी जाहीर सभेत हिंदु धर्म आणि पुरोहित यांची टिंगल केल्याने असंतोष निर्माण झाला आहे. समाजातील एकेका घटकाला लक्ष्य करून आणि विविध समाजघटकांमध्ये विसंवाद निर्माण करत समाजाचे तुकडे करण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते करत आहेत. ही राष्ट्रवादी काँग्रेसची तुकडे तुकडे टोळी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आवरावी, असे आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी २१ एप्रिल या दिवशी केले.
ते म्हणाले की,
१. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची मुसलमान किंवा अन्य धर्मियांच्या धर्मगुरु यांची टिंगल करायची हिंमत होत नाही, हे आश्चर्यकारक आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार आस्तिक आहेत कि नास्तिक आहेत, हे ठाऊक नाही; पण त्यांच्या पक्षाचे नेते आवर्जून हिंदु पुरोहितांची टिंगल करतात, हे सर्वांना दिसते.
२. अमोल मिटकरी व्यासपिठावरून हिंदु पुरोहितांची टिंगल करत असतांना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि मंत्री धनंजय मुंडे हे जोरात हसून चिथावणी देत होते. स्वतःला पुरोगामी म्हणवणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाला एखाद्या समाजघटकाला असे लक्ष्य करणे शोभत नाही; परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचा पुरोगामीपणा केवळ सांगण्यापुरताच आहे. या पक्षाच्या नेत्यांना केवळ विविध समाजघटकांमध्ये भांडणे लावून समाजाचे तुकडे करण्यात रस आहे, असे दिसते.
संपादकीय भूमिका
याविषयी शरद पवार काही बोलतील का ? |