अधिवक्ता गुणरत्न सदावर्ते यांना २५ एप्रिलपर्यंत कोल्हापूर येथे पोलीस कोठडी !
कोल्हापूर, २१ एप्रिल (वार्ता.) – संपकरी एस्.टी. कामगारांचे अधिवक्ता गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात शाहूपुरी पोलिसांनी त्यांना कह्यात घेण्यासाठी गिरगाव येथील न्यायालयात आवेदन सादर केले होते. ते संमत झाल्यावर कोल्हापूर पोलिसांचे पथक ‘आर्थर रोड’ येथील कारागृहातून अधिवक्ता सदावर्ते यांना कह्यात घेऊन २० एप्रिल या दिवशी कोल्हापूर येथे आणण्यात आले. २१ एप्रिल या दिवशी अधिवक्ता सदावर्ते यांना येथील जिल्हा आणि सत्र न्यायालयात उपस्थित करण्यात आले. या वेळी न्यायालयाने त्यांना २५ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
मराठा समाजाच्या आरक्षणाविरोधात सातत्याने चिथावणीखोर वक्तव्य केल्याच्या प्रकरणी सकल मराठा मोर्चाचे समन्वयक दिलीप पाटील यांनी अधिवक्ता सदावर्ते यांच्या विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार त्यांच्यावर गुन्हा नोंद झाला होता. यानंतर कोल्हापूर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.