भारतीय युवकांचे सैन्याविषयीचे आकर्षण !
‘प्रदीप मेहरा नावाच्या मुलाची सध्या सामाजिक माध्यमांवर पुष्कळ चर्चा चालू आहे. सैन्यात भरती होण्यासाठी तो रात्री धावण्याचा सराव करत असल्याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित होत आहे. भारतीय तरुणांमध्ये सैन्याविषयीचे आकर्षण आहे. अनेकांना सैन्यात भरती व्हायचे असते. प्रदीप मेहरा दिवसा एका आस्थापनात चाकरी करतो आणि काम संपल्यानंतर रात्री धावण्याचा सराव करतो. अशी जिद्द ज्याच्यामध्ये आहे, त्याला निश्चितच भारतीय सैन्यात जाण्यात यश मिळेल.
१. सैन्यात भरती होण्यासाठी युवकांनी प्रदीप मेहरासारखे कष्ट करण्याची जिद्द अंगी बाणवावी !
भारतीय सैन्यातून प्रतिवर्षी ६० ते ७० सहस्र लोक निवृत्त होतात. भरतीच्या प्रक्रिया एकदा किंवा दोनदा विविध भागांत चालतात. तरुणांनी अशा प्रकारच्या भरतीमध्ये निवड होण्यासाठी चांगली सिद्धता केली पाहिजे. त्यामुळे सैन्यात भरती होण्याची शक्यता अधिक राहील. सैन्यात कोणतेही आरक्षण नाही. तेथे ज्याला अधिक गुण मिळतात आणि जो चांगले काम करतो, त्यालाच तेथे प्रवेश मिळतो. यासाठी कष्ट घेणे आवश्यक आहे.
भारतीय सैनिकांनी युद्धात दाखवलेले शौर्य तरुणाईला आकर्षित करते. सामाजिक माध्यमांच्या काळात सैन्यात भरती होण्याची प्रदीपची जिद्द तरुणाईसाठी अतिशय प्रेरणादायी आहे. हा (प्रदीप) युवक काम करतो आणि त्याच्या कुटुंबाकडेही लक्ष ठेवतो. त्याला अन्न, वस्त्र आणि निवारा ही लढाईही प्रतिदिन जिंकायची असते. अशा स्थितीतही त्याला सैन्याविषयी विलक्षण आकर्षण आहे. त्यामुळे तो दिवसा चाकरी करून रात्रीच्या वेळी सराव करतो, हे कोणत्याही तरुणासाठी चांगले उदाहरण आहे. त्यामुळे तुम्हाला केंद्रीय सशस्त्र दल, पोलीस, निमलष्करी दल किवा सैन्य यांमध्ये कुठेही जायचे असेल, तर प्रदीपसारखी इच्छाशक्ती ठेवावी लागेल, तसेच परीक्षेसाठी कष्ट घ्यावे लागतील, तरच तुमची सैन्यात भरती होऊ शकते.
२. सैन्याच्या भरतीसाठी आवश्यक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी सिद्धता करणे आवश्यक !
प्रदीप मेहरा हे निश्चितच आदर्श व्यक्तीमत्त्व आहे. तो प्रचंड मेहनत घेण्यासाठी सिद्ध आहे. तो कुणाचेही साहाय्य न घेता हे सर्व करत आहे. तरुणांनी अशा प्रकारे कष्ट घेतले, तर ते निश्चितच सैन्यामध्ये भरती होऊ शकतील. सैन्यात ५० ते ६० सहस्र जागा असतात. तेथे भरतीसाठी येणाऱ्या तरुणांची संख्या लाखांमध्ये असते. त्यामुळे ज्यांना सैन्यात भरती व्हायचे आहे, त्यांना पुष्कळ सिद्धता करावी लागते. शारीरिक सक्षमताही आवश्यक असते. धावण्याची स्पर्धा आणि लेखी परीक्षा उत्तीर्ण कराव्या लागतात. त्यानंतर वैद्यकीय परीक्षा असते. तीसुद्धा उत्तीर्ण करावी लागते. अशा सर्व प्रकारच्या परीक्षा तुम्हाला पार पाडाव्या लागतात. त्यासाठी पूर्ण सिद्धता करणे महत्त्वाचे आहे. प्रदीप त्याचेच एक मोठे उदाहरण आहे.
३. युवकांनी सैन्य भरतीचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांचे साहाय्य घेऊन सैन्यात भरती होण्यासाठी प्रयत्न करावेत !
समाजातील अनेक मोठ्या लोकांनी प्रदीपच्या कार्याची नोंद घेतली आहे. ते त्याला साहाय्यही करतील; पण अन्य तरुणांचे काय ? आज बेकारी ही देशातील सर्वांत मोठी समस्या आहे. लोकांना प्रचंड काम हवे आहे; पण सैन्यात जागा अतिशय अल्प आहेत. त्यासाठी सरकारी पातळीवर पूर्वीपासूनच काम करणे चालू आहे. केवळ महाराष्ट्रात सैन्य भरतीचे प्रशिक्षण देणाऱ्या ३ सरकारी संस्था आहेत. त्या सैन्यात भरती कसे व्हायचे, याचे प्रशिक्षण देतात. ‘बी रिक्रुटमेंट ट्रेनिंग सेंटर’(बी.आर्.टी.सी.) च्या सातारा, कोल्हापूर आणि बुलढाणा येथे शाखा आहेत. नाशिकमध्येही काही संस्था मुलांना साहाय्य करतात. त्या सैन्यात कसे भरती व्हायचे ? याचे प्रशिक्षण देतात. अनेक निवृत्त सैनिक, ‘जेसीओज’ (Junior Commissioned Officers) किंवा सामाजिक कार्यकर्ते लोकांना साहाय्य करतात. त्यामुळे महाराष्ट्रातील तरुणांनी या संस्थांचा चांगल्या प्रकारे लाभ करून घ्यावा. सैन्यात पैसे देऊन भरती केले जात नाही, तर केवळ गुणवत्तेलाच महत्त्व दिले जाते. तसेच तेथील भरती प्रक्रियेचे
१०० टक्के ध्वनीचित्रीकरण केले जाते.
(सौजन्य : Brig Hemant Mahajan,YSM)
४. सैन्यातील माजी वैद्यकीय अधिकाऱ्याकडून वैद्यकीय चाचणी करून घेऊन नंतर सैन्य भरतीसाठी प्रयत्न करणे चांगले राहील !
सैन्यात जाण्याची सिद्धता अल्प कालावधीची नसते. त्यासाठी दीर्घ कालावधीचे नियोजन करावे लागते. प्रथम शारीरिक क्षमता चांगली असायला पहिजे. आपण कुठला खेळ खेळत असू, तरच या परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतो. लेखी परीक्षेसाठी अनेक पुस्तके उपलब्ध आहेत, शिकवणीवर्गही (कोचिंग क्लास) आहेत. याविषयी माहितीजालावरही (इंटरनेटवरही) पुष्कळ माहिती उपलब्ध आहे. अनेक वेळा तरुण परीक्षांमध्ये उत्तीर्ण होतात; पण वैद्यकीय चाचण्यांमध्ये अनुत्तीर्ण होतात. वैद्यकीय पडताळणी करणारे अतिशय उच्च दर्जाचे तज्ञ असतात. आपण आधीच सैन्यातील निवृत्त आधुनिक वैद्याकडून आपली वैद्यकीय चाचणी करून घेतली, तर काही समस्या असल्यास आधीच कळू शकतील. समस्या तात्पुरत्या असतील, तर त्याला परत एकदा चाचणीमध्ये येण्याची संधी दिली जाते. तुमच्यातील वैद्यकीय समस्या मोठ्या असतील, तर तुम्ही सैन्यात न आलेले बरे ! तुम्ही अशा शारीरिक तंदुरुस्ती जिथे लागणार नाही, तेथे जाणे श्रेयस्कर राहील !
५. सर्व क्षेत्रांतील स्वयंचलित यंत्रणांमुळे कामगारांची कार्यक्षमता वाढल्याने नोकऱ्या अल्प प्रमाणात उपलब्ध होणे
सध्या तरुणाई भ्रमणभाष संचावरील सामाजिक माध्यमांमध्ये अडकली आहे. भारताची प्रचंड प्रगती होत आहे; परंतु ज्या वेगाने नोकऱ्यांची निर्मिती व्हायला पाहिजे, ती होत नाही. गेल्या काही वर्षांत ही गोष्ट अजिबात साध्य झालेली नाही, उदा. टाटासारख्या आस्थापनामध्ये एकावेळी १५ सहस्र लोक काम करायचे. आता ५ सहस्र कामगार १५ सहस्र लोकांचे काम करतात. अशाच प्रकारच्या स्वयंचलित यंत्रणा अनेक क्षेत्रांत कार्यरत आहेत. त्यामुळे केवळ कष्ट करण्याची आवश्यकता आहे. प्रदीप मेहरा याने ती दाखवली आहे.
६. सैन्यात जाऊ इच्छिणाऱ्या युवकांमध्ये महाराष्ट्राबाहेर जाण्याची इच्छा आणि देशाच्या सर्व सीमावर्ती भागांत फिरण्याचे धाडस असणे आवश्यक !
कुठल्या क्षेत्रात ‘करिअर’ करायचे, हे २-३ वर्षांआधीच तो युवक, त्याचे पालक आणि शिक्षक यांनी ठरवणे आवश्यक आहे. त्यामुळे युवकांना २-३ ठिकाणीच लक्ष केंद्रित करून सिद्धता करता येईल. त्यामुळे एका ठिकाणी जाण्यास तुम्हाला यश मिळेल, उदा. जर तुम्हाला सैन्यात भरती व्हायचे असेल, तर सैन्याविना केंद्रीय सशस्त्र पोलीस दल, सीमा सुरक्षा दल, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, इंडो-तिबेटियन सीमा पोलीस, तसेच निमलष्करी दल, पोलीस आदींच्या भरतीसाठीही सिद्धता करायला पाहिजे. त्यांच्याही परीक्षा जवळजवळ समानच असतात. आज महाराष्ट्रातील अनेक युवक हे ‘आसाम रायफल’ या निमलष्करी दलात भरती होत आहेत. त्यासाठी महाराष्ट्राच्या बाहेर जाण्याची इच्छा आणि देशाच्या सर्व सीमावर्ती भागांत फिरण्याचे धाडस हवे. हे साध्य करण्यासाठी युवकांनी एकाच वेळी २-३ ठिकाणांवर लक्ष केंद्रित करावे आणि अनेक वर्षे सिद्धता करावी. असे झाले, तर तुमच्या कष्टाला निश्चित यश मिळू शकेल.’
– (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन, पुणे