(म्हणे) ‘मी रामाला ओळखत नाही आणि राज्यात रामाचे मंदिरही नाही !

तमिळनाडूतील काँग्रेसच्या महिला खासदार ज्योतीमणी यांचा दावा !

काँग्रेसच्या महिला खासदार ज्योतीमणी

चेन्नई (तमिळनाडू) – तमिळनाडूतील काँग्रेसच्या महिला खासदार ज्योतीमणी यांनी ‘मी भगवान रामाला ओळखत नाही आणि राज्यात रामाचे मंदिरही नाही’ अशा प्रकारचे विधान केल्याचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे. यावरून त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे.

१. ज्योतीमणी या व्हिडिओत म्हणत आहेत, ‘मी तमिळनाडूतील आहे. आम्ही स्थनिक लोक आहोत आणि आम्ही आमच्या पूर्वजांच्या परंपरांचे पालन करतो. तुम्ही तमिळनाडूमध्ये कुणालाही विचारल्यास ते म्हणतील, ‘आम्ही तमिळनाडूमध्ये राममंदिर कुठेच पाहिलेले नाही. आम्ही दलित, अन्य मागासवर्गीय, आदिवासी आणि मूळ निवासी आहोत. आम्ही आमच्या पूर्वजांचे पूजन करतो.’ मी रामायण, महाभारत वाचते; मात्र पूजा करतांना पूर्वजांची करते.’

२. या व्हिडिओवरून अनेकांनी ज्योतीमणी यांना तमिळनाडूतील श्रीरामाच्या मंदिरांची आठवण करून देतांना त्यांची नावे आणि स्थान सांगितले आहे. यात त्रिची शहराच्या जवळील श्री रंगनाथ स्वामी मंदिर, तिरुवन्नामलाई येथील आदि श्री रंगम मंदिर, पल्लीकोंडामधील श्री रंगनाथर मंदिर, मदुरंतगाममधील एरी कथा राममंदिर, रामेश्‍वरम्मधील रामनाथ स्वामी मंदिर यांची नावे सांगितली आहेत.

संपादकीय भूमिका 

तमिळनाडूमध्ये ‘श्रीराम हा आर्य म्हणजे बाहेरून आलेला आणि तमिळनाडूतील लोक म्हणजे स्थानिक द्रविडी लोक’, असे विष कथित सुधारणावाद्यांनी गेली कित्येक वर्षे तेथील जनतेच्या मनात पेरले आहे. त्यामुळे अशी विधाने केली जातात. त्यात काँग्रेसवाले हे हिंदुद्वेषाने पछाडलेले असतात. त्यामुळे ज्योतीमणी अशी विधाने करत आहेत !