राज ठाकरे यांच्या संभाजीनगर येथील सभेला ५ हून अधिक संघटनांचा विरोध !
पोलिसांनी अनुमती नाकारली, तरी १ मे या दिवशी सभा होणारच ! – मनसे
संभाजीनगर – १ मे या दिवशी महाराष्ट्रदिनानिमित्त मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची शहरातील खडकेश्वर येथील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर भव्य सभा आयोजित केली आहे. यासाठी मनसेने पोलीस आयुक्तांची भेट घेऊन सभेसाठी अनुमती मागणारे निवेदनही दिले आहे; मात्र राज ठाकरे यांच्या सभेला ५ हून अधिक राजकीय संघटनांकडून कडाडून विरोध केला जात आहे. पोलिसांनी सभेला अद्याप अनुमती दिलेली नाही. अनुमतीपत्र, शहरातील विविध संघटनांचा विरोध आणि कायदा यांविषयी वरिष्ठ अधिकार्यांच्या १९ एप्रिल या दिवशी दिवसभर बैठका चालू होत्या.
मुस्लिम नुमाइंदा कौन्सिल, वंचित बहुजन आघाडी, मौलाना आझाद विचार मंच, ऑल इंडिया पँथर सेना, प्रहार जनशक्ती पक्ष, गब्बर ॲक्शन संघटना. या संघटनांच्या पदाधिकार्यांनी ‘राज ठाकरे यांच्या सभेमुळे शहरातील धार्मिक सलोखा बिघडू शकतो. त्यामुळे त्यांच्या सभेला अनुमती देऊ नये’, अशी मागणी पोलीस आयुक्तांना निवेदनाद्वारे केली आहे.
सभेच्या अनुमतीसाठी मनसेचे पोलिसांना निवेदन !
सभेसाठी जवळपास १ लाख लोक येतील, असा अंदाज मनसेने व्यक्त केला आहे. त्यामुळे ‘दुपारी ४.३० ते रात्री ९.४५ वाजेपर्यंत सभेला अनुमती द्यावी’, अशी मागणी त्यांनी पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांच्याकडे केली आहे. आयुक्तांनी त्यांना ‘सार्वजनिक बांधकाम विभागाकडून व्यासपीठ, अग्नीशमन दल, वीजपुरवठा आदींची अनुमती घ्या. आम्ही निरीक्षक करू’, असे आश्वासन दिले आहे. या वेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर, दिलीप बनकर, सतनामसिंह गुलाटी आदी पदाधिकारी उपस्थित होते. या सभेला पोलिसांनी अनुमती नाकारली ,तरी १ मे या दिवशीच सभा होईल, असेही मनसेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.