८ सहस्र मेगावॅट औष्णिक वीजनिर्मितीचे उद्दिष्ट ठेवून तातडीने उपाययोजना करा ! – मुख्यमंत्री
मुंबई – राज्याला वीजनिर्मितीमध्ये स्वयंपूर्ण करण्यासाठी तात्कालिक आणि दीर्घकालीन धोरण निश्चित करावे. विजेची वाढती मागणी लक्षात घेऊन ८ सहस्र मेगावॅट औष्णिक वीजनिर्मितीचे उद्दिष्ट ठेवून तातडीच्या उपाययोजना कराव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.
राज्याची सध्याची वीजनिर्मिती, कोळशाचा साठा, विजेची आजची आणि भविष्यातील मागणी यांविषयी करावयाच्या उपाययोजना यांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्यासमवेत बैठक झाली. या वेळी ऊर्जा विभागाचे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, तसेच प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. ‘उरण येथील गॅस प्रकल्प चालू करण्यासाठी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी स्वत: बोलणार आहे’, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.