सांगली येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभेत ब्राह्मण समाजाची अपकीर्ती होत असतांना त्याला हसून दाद देणारे जयंत पाटील आणि धनंजय मुंडे यांचा निषेध ! – विश्वजित देशपांडे, अध्यक्ष, परशुराम सेवासंघ
सांगली, २० एप्रिल (वार्ता.) – सांगली येथे राष्ट्रवादी काँग्रेसची एक सभा झाली. या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी ब्राह्मण समाजाची (पुरोहितांची) अपकीर्ती केली. अमोल मिटकरी यांच्या वक्तव्यावर सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे हसत होते. याचा आम्ही निषेध करतो, असे प्रतिपादन परशुराम सेवासंघाचे अध्यक्ष श्री. विश्वजित देशपांडे यांनी केले आहे.
विश्वजित देशपांडे पुढे म्हणाले, ‘‘अमोल मिटकरी यांनी विवाहाच्या संदर्भात पुरोहितांवर अनेक आक्षेपार्ह वक्तव्ये केली. वास्तविक मंत्रीपदाची शपथ घेतांना ‘सर्वांना समान न्याय देऊ’, असे म्हटलेले असते. त्यामुळे ही शपथ घेतलेली असतांना एका समाजाची अपकीर्ती होत असतांना पालकमंत्री हसतात याचा अर्थ काय ? ही अपकीर्ती थांबवण्याचे दायित्व जयंत पाटील यांचे नाही का ? ही राष्ट्रवादी काँग्रेसची अधिकृत भूमिका आहे का ? हे मंत्री जेव्हा ब्राह्मण समाजाकडे मते मागण्यासाठी येतील, तेव्हा त्यांना ब्राह्मण समाजाने निश्चित प्रतिप्रश्न केला पाहिजे.’’