केसांचे सौंदर्य कसे राखावे ?
‘आपल्या आजूबाजूच्या १० लोकांमध्ये ५ जणांना तरी ‘आपले केस पुष्कळ गळत आहेत’, असे वाटत असते. प्रतिदिन ५० ते १०० केस गळणे, हे नैसर्गिक आहे. केसगळतीवर कोणत्या उपाययोजना कराव्यात, याविषयीची माहिती पुढे दिली आहे.
१. केसांच्या वाढीचे ३ टप्पे
केसांच्या वाढीमध्ये वाढ, विश्रांती आणि गळती असे ३ टप्पे असतात. त्यानुसार केसांचे चक्र चालू असते. त्यामुळे ‘कधीतरी केस गळत आहेत’, असे वाटू शकते; मात्र याला घाबरून जाऊ नये; कारण दुसरीकडे नवे केस येणे अखंड चालू असते.
२. केसगळतीची प्रमुख कारणे
केसातील कोंडा, कधी कधी ‘थायरॉईड’ची समस्या, शरिरात रक्त अल्प असणे, कुपोषण ही केस गळण्याची काही प्रमुख कारणे असू शकतात. त्यामुळे त्यांवर योग्य ते उपचार त्वरित केले पाहिजेत.
३. आहार कोणता घ्यावा ?
वरवर उपाय करण्यापेक्षा आहार उत्तम ठेवण्याकडे लक्ष द्यावे. जीवनसत्त्व अधिक असलेला आहार, अंडी, सुकामेवा यांच्यामुळे केस चांगले होतात. शाकाहारी लोक त्यांच्या आहारात डाळी, उसळी, मोड आलेले कडधान्य, बदाम, अक्रोड, पिस्ता (प्रमाणात) यांचा समावेश करू शकतात. थोडा भात आणि अधिक वरण असा आहारही उत्तम राहील.
४. काय करू नये ?
केस पुष्कळ उष्ण पाण्याने धुणे आणि नंतर खसाखसा पुसणे टाळावे. शाम्पू सौम्य असावा. ओले केस लगेच विंचरू नयेत. रात्री झोपतांना एकदा केस विंचरावेत.
५. कंडिशनर वापरल्याने केसांमध्ये गुंता अल्प होतो आणि केस चमकदार दिसतात.
६. केसांना नियमित तेल लावणे उत्तम आहे; पण तेल लावून बाहेर गेल्यास केसांत घाण साठून आणि धूळ बसून त्यांची हानी होऊ शकते.
७. ‘मॉईश्चरायझर’चे लाभ
आपला तोंडवळा तरुण ठेवायचा असेल, तर आयुष्यभर नियमित ‘मॉईश्चरायझर’ वापरणे चांगले आहे. कोरड्या त्वचेवर लवकर सुरकुत्या पडतात, तसेच वय वाढत जातांना त्वचाही नाजूक होते. त्यामुळे प्रत्येकाला ‘फेशिअल’ (तोंडवळ्याच्या सौंदर्यवर्धनासाठी केले जाणारे उपचार) मानवेलच, असे नाही. यासमवेत सतत ‘फेस स्क्रब’ करणेही योग्य नाही.’
– डॉ. शिल्पा चिटणीस-जोशी, स्त्रीरोग आणि वंध्यत्व तज्ञ, कोथरूड, पुणे.