सतत साधकांचा विचार करणारे आणि साधकांना प्रेम देऊन त्यांना घडवणारे सनातनचे २६ वे संत पू. सदाशिव परब (पू. भाऊकाका) (वय ८१ वर्षे) !
पू. सदाशिव परब (पू. भाऊकाका) यांच्याविषयी कोल्हापूर सेवाकेंद्रातील साधकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.
श्री. महेश आणि सौ. सुमन पेडणेकर
१. प्रेमभाव
अ. ‘पू. भाऊकाका प्रेममूर्ती आहेत. त्यांना ‘साधकांनी नामजपादी उपाय करावेत आणि साधकांची लवकरात लवकर आध्यात्मिक उन्नती व्हावी’, असे वाटते. पू. भाऊकाका म्हणतात, ‘‘प्रेमाने जग जिंकता येते.’’
आ. पू. भाऊकाकांना ‘एखादा साधक रुग्णाईत आहे’, असे समजल्यास ते स्वतःहून त्या साधकाच्या खोलीत जाऊन त्याची प्रेमाने विचारपूस करतात आणि त्याला नामजपादी उपाय करायला सांगतात.’
सौ. सुमन महेश पेडणेकर
पू. भाऊकाकांनी विचारपूस केल्यावर ‘पू. भाऊकाकांच्या माध्यमातून परात्पर गुरु डॉ. आठवले विचारपूस करत आहेत’, असे जाणवणे आणि सनातनचे सर्व संत तत्त्वरूपाने एकच असल्याची प्रचीती येणे : ‘एकदा माझ्या माहेरच्या सदस्यांमध्ये मतभेद झाले होते. त्यामुळे मला ताण आला होता. तेव्हा पू. भाऊकाकांनी अकस्मात् मला विचारले, ‘‘तुझ्या माहेरी सर्व बरे आहेत ना ?’’ त्या वेळी ‘पू. काकांच्या माध्यमातून परात्पर गुरु डॉ. आठवले माझी विचारपूस करत आहेत’, असे मला वाटले. मला त्यांचा पुष्कळ आधार वाटला. मी त्याविषयी वहिनीला सांगत असतांना माझ्या पायावर २ दैवी कण आढळले. या प्रसंगातून ‘परात्पर गुरु डॉक्टर आणि सनातनचे सर्व संत तत्त्वरूपाने एकच आहेत’, याची प्रचीती आली.’
सौ. सुजाता जामदार, वालचंदनगर, पुणे
१. एकदा पू. भाऊकाका वालचंदनगर केंद्रात आले असतांना मी दिवसभर त्यांच्या समवेत सेवेला होते. तेव्हा मला भावस्थिती अनुभवता आली. मला दिवसभर अन्य काहीही आठवत नव्हते.
२. मी कोल्हापूर सेवाकेंद्रात सेवा करतांना पू. भाऊकाकांतील चैतन्यामुळे माझ्या मनातील अनावश्यक विचार नाहीसे होतात आणि माझ्यावर आलेले आवरण दूर होते.’
श्री संतोष गावडे, श्री. महेश आणि सौ. सुमन पेडणेकर
गुरुकार्याचा ध्यास : ज्ञानशक्ती प्रसार अभियानाची सेवा चालू झाल्यापासून पू. काका या वयातही दुपारी केवळ अर्धा घंटा विश्रांती घेतात. ते दिवसभर आनंदाने आणि उत्साहाने सेवा करतात. ते रात्री उशिरापर्यंत थांबून सेवा करतात. सेवाकेंद्रात ग्रंथ आल्यावर ग्रंथांचे गठ्ठे उचलायला साहाय्य करणे, खोक्यांत ग्रंथ भरणे इत्यादी सेवा करण्यासाठी ते नेहमी तत्पर असतात.
सौ. अरुणा पोवार
१. मनात नकारात्मक विचार येत असतांना पू. भाऊकाकांनी सूक्ष्मातून त्या विचारांतून बाहेर काढणे
‘एकदा मी ध्यानमंदिरात बसून नामजप करत होते. तेव्हा काही कौटुंबिक प्रसंग आठवल्याने माझ्या मनात ‘कुटुंबीय कसे अयोग्य वागतात ?’, असा विचार आला. त्या क्षणी माझ्या अनाहतचक्रातून पू. भाऊकाकांचा ‘तसे नव्हे’, असा आवाज आला. त्यामुळे मी डोळे उघडले. त्या वेळी ‘ते ध्यानमंदिरात येत आहेत’, असे मला जाणवले. प्रत्यक्षात त्या वेळी ते खोलीत होते. त्यानंतर माझ्या मनातील नकारात्मक विचार न्यून झाले.
२. इतरांचा विचार करणे
अ. कोल्हापूर येथील साधकांना पू. काकांसाठी अल्पाहार आणि महाप्रसाद बनवण्याचे परम भाग्य मिळाले. त्यांच्यासाठी पथ्याचे वेगवेगळे पदार्थ करावे लागत होते. पू. काकांच्या हे लक्षात आल्यावर त्यांनी त्यातील काही पदार्थ न्यून करायला सांगितले. ‘आपल्यासाठी साधकांचा वेळ वाया जायला नको’, असा त्यांचा विचार होता.
आ. एकदा मी पू. काकांसाठी पथ्याची आमटी करायला विसरले होते. पू. काका जेवायला येण्यापूर्वी ५ मिनिटे मला याची आठवण झाली. तेव्हा मी त्यांना सांगितले, ‘‘दहा मिनिटांत आमटी करते.’’ तेव्हा पू. काका मला म्हणाले, ‘‘मी एक दिवस कशाशीही खाऊ शकतो. आता तुझा करण्यात वेळ जाईल.’’ त्यांनी मला आमटी बनवू दिली नाही.
श्री. किरण दुसे
पू. भाऊकाकांतील चैतन्यामुळे त्रासदायक शक्तीचे आवरण न्यून होणे
‘काही वेळा माझ्या मनात अनावश्यक विचार येतात किंवा मला माझ्यावर त्रासदायक शक्तीचे आवरण आल्याचे जाणवते. अशा वेळी पू. भाऊकाकांचा सहवास लाभल्यास किंवा त्यांच्याशी थोडे बोलल्यावर माझ्यावरील आवरण न्यून झाल्याचे मला जाणवते आणि मला हलकेपणा जाणवतो.’
श्री. महेश पेडणेकर
१. गुरुकार्याचा ध्यास
‘पू. काकांना अनेक वेळा साधकांसाठी दिवसातील ५ – ६ घंटे नामजपादी उपाय करावे लागतात. नंतर ४ – ५ घंटे ते ग्रंथांची तपासणीही करतात.
२. आपत्काळाच्या दृष्टीने दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करणे
पू. काकांनी गुरुदेवांवर श्रद्धा ठेवून आपत्काळाच्या संदर्भातील सूचनांचे तंतोतंत पालन केले. त्यांनी त्यांचे कुटुंबीय आणि साधक यांच्याकडून आपत्काळाच्या दृष्टीने सिद्धता करवून घेतली, उदा. धान्य आणि पुढे न मिळणारे साहित्य साठवणे. ते सर्वांना सांगतात, ‘‘गुरुदेव सांगतात, त्याप्रमाणे आपण केले पाहिजे.’’
सौ. काव्या किरण दुसे
१. आधार देणे
‘एकदा माझ्या सासूबाई रुग्णाईत असल्यामुळे मी घरी गेले होते. पू. काकांचा मला भ्रमणभाष आल्यावर मी त्यांना सासूबाईंच्या गंभीर स्थितीविषयी सांगत होते. तेव्हा पू. काका मला म्हणाले, ‘‘अजून त्यांना भरपूर आयुष्य आहे. त्यांना काही होणार नाही. तुम्ही काळजी करू नका. केवळ गुरुदेवांना सांगत रहा.’’ त्या वेळी मला त्यांचा आधार वाटला.
२. संत असूनही नवीन सेवा शिकणे
अ. एकदा अल्पाहार सेवा शिकण्यासाठी उत्सुक असणार्या साधकांनी नावे लिहिण्यासाठी स्वागतकक्षात एक वही ठेवली होती. त्या वेळी पू. भाऊकाकांनी वहीत अल्पाहार सेवा शिकण्यासाठी स्वतःचे नाव लिहिले.
आ. पू. काकांना साधकांसाठी नामजपादी उपाय करायला सांगितले होते. आधी त्या सेवेचा आढावा पाठवण्यासाठी पू. काकांना साधकांचे साहाय्य घ्यावे लागत होते. एकदा त्यांनी माझ्याकडून ‘व्हॉट्सॲप’मध्ये टंकलेखन कसे करायचे ?’, हे शिकून घेतले. त्यानंतर ते स्वतःच सेवेचा आढावा पाठवू लागले.
इ. पू. काकांना कोल्हापूर सेवाकेंद्रातील साधकांच्या व्यष्टी साधनेचा आढावा घ्यायला सांगितला होता. ते पूर्वी अन्य ठिकाणच्या साधकांचा व्यष्टी साधनेचा आढावा घेत होते, तरीही त्यांनी पूर्वी कोल्हापूर सेवाकेंद्रातील साधकांचा व्यष्टी साधनेचा आढावा घेणार्या साधिकेला विचारून तिच्याकडून शिकून घेतले. या प्रसंगात त्यांच्यात ‘मी संत आहे किंवा मी यापूर्वी ही सेवा केली आहे’, असा विचार जाणवला नाही.
३. पू. काकांच्या संकल्पामुळे विचित्र स्वप्न पडायचे थांबणे
मध्यंतरी बर्याच वेळा मला एक विचित्र स्वप्न पडत होते. नंतर सेवा करतांना माझ्या मनात अकस्मात् त्याविषयी अनावश्यक विचार चालू होऊन माझा सेवेतील वेळ जायचा. त्याची वारंवारता वाढू लागल्यावर मी पू. काकांना त्या स्वप्नाविषयी सांगितले. त्यावर ते हसले आणि मला म्हणाले, ‘‘यापुढे तुला ते स्वप्न पडणार नाही. तू त्याचा विचार करू नकोस.’’ त्या वेळी ‘त्यांनी जणू काही मला चैतन्य दिले’, असे मला वाटले. त्यानंतर वर्षभरात मला पुन्हा तसे स्वप्न कधीच पडले नाही. त्यामुळे मला पू. काकांबद्दल पुष्कळ कृतज्ञता वाटते.
४. परात्पर गुरु डॉ. आठवले पू. काकांच्या माध्यमातून स्वप्नात आल्याचे जाणवणे
एकदा मला स्वप्नात दिसले, ‘परात्पर गुरु डॉक्टर कोल्हापूर सेवाकेंद्राची नारळाने दृष्ट काढत सेवाकेंद्राभोवती प्रदक्षिणा घालत आहेत. त्या नारळात आश्रमावर आलेले अनिष्ट शक्तीचे आवरण आणि साधकांचे आध्यात्मिक त्रास खेचले जात आहेत. ‘परात्पर गुरुदेव स्वप्नात आले आणि त्यांनी सर्वांचे आध्यात्मिक त्रास दूर केले’, या विचाराने मला फार आनंद झाला. मला जाग आल्यावर मला माझ्या प्रकृतीत पालट जाणवू लागला. मी पू. काकांना या स्वप्नाविषयी सांगितले. त्या वेळी पू. काकांनी मला सांगितले, ‘‘आज मी आश्रमाची नारळाने प्रत्यक्ष दृष्ट काढली आहे.’’ त्या वेळी माझी भावजागृती झाली.
५. सनातनच्या दोन संतांनी शोधलेले नामजप एकच येणे, यातून ‘गुरुतत्त्व एकच असते’, याची प्रचीती येणे
एका साधिकेला आध्यात्मिक त्रास होतअसतांनापू. काकांनी तिला नामजप शोधून दिला. तिला थोडे बरे वाटू लागले. त्यानंतर अर्ध्या घंट्यांनी सद्गुरु सत्यवान कदम यांनी त्या साधिकेसाठी नामजप शोधून कळवला. पू. काका आणि सद्गुरु सत्यवानदादा यांनी शोधलेला नामजप एकच होता. असे आश्रमातील अन्य दोन साधकांच्या संदर्भातही घडले. त्या वेळी ‘सनातनच्या संतांतील गुरुतत्त्व एकच असते’, हे लक्षात आले.
६. निरपेक्ष प्रेम आणि सतर्कता
प्रसारातील साधक श्री. दीपक भोपळे यांच्या विवाहाची लग्नपत्रिका आश्रमातील साधकांना दिली होती. बाहेर ‘कोरोना’चा संसर्ग असल्याने साधकांना विवाहाला जाणे शक्य नव्हते. पू. भाऊकाकांनी नियोजन केल्याप्रमाणे साधकांनी विवाहाच्या मुहूर्ताच्या वेळी लग्नपत्रिकेवर प्रार्थना करून अक्षता ठेवल्या. नंतर पू. काकांनी एका साधिकेला या अक्षता जपून ठेवायला सांगितल्या. पू. काकांनी त्या साधिकेला सांगितले, ‘‘श्री. दीपक भोपळे आणि त्यांच्या सौभाग्यवती सेवाकेंद्रात आल्या की, त्यांना या अक्षता द्या.’’
(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक १०.१२.२०२१)
परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे आज्ञापालन करणारे आणि त्यांच्याप्रती भाव असणारे पू. सदाशिव परब (पू. भाऊकाका) !
१. साधकांकडून व्यायाम करवून घेऊन गुर्वाज्ञापालन करणे
परात्पर गुरु डॉक्टरांनी ‘व्यायाम करणे’, हा साधनेतील एक घटक आहे’, असे सांगितल्यापासून पू. भाऊकाका कुठलीही सवलत न घेता नियमितपणे पहाटे साडेपाच वाजल्यानंतर व्यायाम करतात आणि आम्हा साधकांकडूनही करवून घेतात.
२. साधकांच्या व्यष्टी साधनेच्या प्रयत्नांत सातत्य येऊन त्यांचा उत्साह वाढणे
पू. भाऊकाका यांनी कोल्हापूर सेवाकेंद्रातील साधकांच्या व्यष्टी साधनेचा आढावा घेणे चालू केल्यापासून साधकांच्या व्यष्टी साधनेच्या प्रयत्नांमध्ये सातत्य आले आहे, तसेच त्यांचा उत्साह वाढला आहे. पू. काका व्यष्टी साधनेच्या आढाव्यात प्रत्येक सूत्र भावपूर्ण सांगतात. त्या वेळी साधकांचा भाव दाटून येतो आणि साधकांना ‘ते कोठे अल्प पडतात’, याची जाणीव होते.
३. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव
पू. भाऊकाका रामनाथी आश्रमात गेले असतांना परात्पर गुरुदेवांनी त्यांना भेटस्वरूप ‘योगा मॅट’ (योगासने करण्यासाठी चटई) दिली. पू. काकांनी ती सर्व साधकांना भावपूर्णरित्या दाखवली. ‘योगा मॅट’ व्यवस्थित रहावी’, यासाठी त्यांनी सौ. सुमन पेडणेकर यांच्याकडून ‘योगामॅट’साठी ‘कव्हर’ शिवून घेतले. यातून त्यांचा परात्पर गुरु डॉक्टरांप्रतीचा उत्कट भाव लक्षात येतो.’
– कोल्हापूर सेवाकेंद्रातील साधक (१०.१२.२०२१)
|