अचलपूर (जिल्हा अमरावती) येथील भाजपचे शहराध्यक्ष अभय माथने यांच्यासह २७ आरोपींना ३ दिवसांची पोलीस कोठडी !
अचलपूर येथील २ गटांतील दगडफेकीचे प्रकरण
अमरावती – जिल्ह्यातील अचलपूरमधील २ गटांतील दगडफेकीच्या प्रकरणी अचलपूर येथील भाजपचे शहराध्यक्ष अभय माथने यांच्यासह २७ आरोपींना ३ दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे. पुणे येथील पिंपरी-चिंचवड येथून अभय यांना पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर पोलिसांनी त्यांना २० एप्रिल या दिवशी न्यायालयात उपस्थित केले. आतापर्यंत दगडफेकीच्या प्रकरणी पोलिसांनी एकूण २७ आरोपींना अटक केली आहे. परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी खासदार सौ. नवनीत राणा अचलपूर येथे भेट देणार आहेत. त्या पोलीस अधिकार्यांना भेटतील.
अत्यावश्यक सेवा वगळता घराबाहेर पडण्यास नागरिकांना बंदी !
अचलपूर गावात सध्या शांतता आहे. तेथे संचारबंदी लागू आहे. गावातील नागरिकांना सकाळी ६ ते ९.३० वाजेपर्यंत वस्तू खरेदी करण्यासाठी सवलत देण्यात आली आहे. परिस्थिती पाहून हळूहळू शिथिलता देण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले. सध्या शाळा आणि महाविद्यालये बंद आहेत. महत्त्वाच्या कामासाठीच घराबाहेर पडू दिले जात आहे. वैद्यकीय, तसेच अत्यावश्यक सेवा वगळता घराबाहेर पडण्यास बंदी आहे. खासदार नवनीत राणा यांनी अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत सातव यांच्याशी या विषयावर चर्चा केली आहे.