परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या गुरुपादुका पूजन सोहळ्याची ध्वनीचित्र-चकती पहात असतांना त्यांना रामाच्या रूपात पाहून त्यांना आर्ततेने आळवणार्या ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. महानंदा पाटील !
१२.२.२०१९ या दिवशी देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमात परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या गुरुपादुका पूजन सोहळ्याची ध्वनीचित्र-चकती दाखवण्यात आली. त्या वेळी माझे रामरूपी परात्पर गुरु डॉक्टरांशी सूक्ष्मातून झालेले बोलणे येथे दिले आहे.
१. प्रार्थना
१ अ. ‘श्रीरामा, पादुकांच्या रूपात मला प्रतिदिन तुझे दर्शन व्हावे आणि ‘तू सगुणात असतांना तुझ्या जवळ येण्याचा दिवस लवकर येऊ दे’, अशी प्रार्थना करणे : परात्पर गुरु डॉक्टरांच्या गुरुपादुकांचे दर्शन घेतांना मी प्रार्थना केली, ‘हे श्रीरामा, तू माझ्यासाठी किती करतोस ! तू माझ्याजवळ सगुणात नाहीस; मात्र मला तुझे प्रतिदिन दर्शन व्हावे, यासाठी तू पादुका स्थापन केल्या आहेस. तू सगुणात असतांना तुझ्याजवळ येण्याचा दिवस लवकर येऊ दे. मी संत व्हावे आणि तुझ्या कार्याला हातभार लावावा आणि मला धर्मप्रचार करता यावा. मला या जगातील अन्य काही नको.’
१ आ. ‘देव, सगुणात असतांनाच संत व्हावे’, अशी इच्छा असणे आणि देव निर्गुणात असला, तरीही त्याच्या आशीर्वादाने तोच या दासीकडून साधना करवून घेणार असल्याची निश्चिती होणे : श्रीरामा, तू कलियुगात अवतरलास. मी या संधीचा लाभ करून घेतला नाही, तर माझ्यासारखी कमनशिबी (दळभद्री) कुणीही नसेल. मला माझ्या स्वभावदोषांवर मात करता येऊ दे. देवा, मला तुझ्या अस्तित्वाचा लाभ करून घेता येऊ दे. हे श्रीरामा, तू आहेस; म्हणून मी आहे. ‘तू सगुणात असतांनाच मी संत व्हावे’, असे मला वाटते. तू निर्गुणात असतांना तूच या दासीकडून साधना करवून घेणार आहेस आणि मला संत बनवून तुझे धर्मकार्य करवून घेणार आहेस. मी सप्तलोक आणि ब्रह्मांड यांमध्ये जिथे कुठे असेन, तेथे तू माझ्याजवळ असणार आहेस. तू मला तुझ्या चरणांजवळ घेशील.
२. देवाच्या चरणांजवळ जाण्याची पुष्कळ घाई होणे, ‘सेवा आणि साधना करत रहायचे’, असे मनाशी ठरवणे
श्रीरामा, ‘तुझे माझ्याकडे लक्ष आहे’, हे मला जाणवते; पण देवा, तुझ्या चरणांजवळ येण्याची मला पुष्कळ घाई झाली आहे. मी मनाशी ठरवले आहे, ‘सेवा आणि साधना करत रहायचे.’ हे रामा, ‘माझी आध्यात्मिक उन्नती होणे आणि पातळी वाढणे’, हे मी तुझ्यावर सोडले आहे.
३. गुरुपादुका पूजनसोहळा पहातांना आलेल्या अनुभूती
३ अ. मधूनमधून ‘राम राम’ असा नामजप चालू असणे आणि तो बंद करण्याचा प्रयत्न केल्यावरही चालू रहाणे अन् ‘त्याने लाभच होईल’, असे वाटणे : श्रीरामा, १० ते १५ दिवसांपासून माझा मधूनमधून ‘राम राम’ असा नामजप चालू होता. तेव्हा माझ्या मनात विचार आला, ‘माझा रामाचा नामजप का चालू आहे ?’ तेव्हा मी तो बंद करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर ‘रामाचा नामजप आपोआप होत आहे, तर होऊ दे. त्याने काहीच हानी नाही. रामाच्या नामाने लाभच होईल’, असे मला वाटले. ‘श्रीरामा, तुझ्या पादुकांचे पूजन होणार होते; म्हणून माझा आधीपासून रामनामाचा जप चालू झाला होता’, हे तुझ्या पादुकांचे दर्शन घेतांना माझ्या लक्षात आले.
३ आ. श्रीरामाच्या चरण-पादुकांची पूजा (गुरुपादुका-पूजन) चालू असतांना ‘मी स्वतःच ती करत आहे’, असे वाटणे आणि मन निर्विचार होणे : श्रीरामा, तू माझ्यासाठी पुष्कळ केले आहेस आणि करत आहेस. तुला भेटण्याची, भक्ती करण्याची, तुझ्याशी एकरूप होण्याची आणि तुझ्या चरणांची दासी होण्याची आस तू पूर्ण करणार आहेस. हे मी आतून अनुभवत आहे. तुझ्या चरण-पादुकांची पूजा (गुरुपादुका-पूजन) चालू असतांना जणू ‘ती मीच करत आहे’, असे मला वाटत होते. तेव्हा माझे मन निर्विचार झाले होते. गुरुपादुका पूजन चालू असतांना मला रामाचेच मुख दिसत होते.
३ इ. डोक्याभोवती संरक्षककवच निर्माण होणे आणि डोक्यातील सर्व विचार निघून जाणे : तेव्हा माझ्या डोक्याभोवती संरक्षककवच निर्माण झाले आणि माझ्या डोक्यातील सर्व विचार नाहीसे झाले. त्यानंतर हे विचार संरक्षककवचाच्या बाहेर राहिले. ते आत येऊ शकत नव्हते. रामा, तू माझ्यासमोर असशील, तेव्हा माझ्या मनात तूच असशील. तेव्हा माझे देहभान हरपलेले असेल. माझे मन म्हणजे तूच असशील.
३ ई. गुरुपादुका फणसाच्या झाडाच्या लाकडापासून बनवल्या आहेत; पण मला त्या चंदनाच्या दिसत होत्या आणि त्यांना चंदनाचा सुगंधही येत होता.
४. ‘श्रीरामाच्या चरणपादुका समोर असाव्यात आणि त्या पादुकांकडे पहात रहावे’, असे वाटणे
रामा, मला वाटते, ‘तुझ्या चरणपादुका समोर असाव्यात आणि मी पादुकांकडे पहातच रहावे.’ श्रीरामा, ‘हा दिवस कधी येईल ?’, हे तुलाच ठाऊक. तो दिवस दूर नाही. तो दिवस येण्यासाठी ‘मी कुठे अडकले आहे ?’, हे मला कळत नाही. श्रीरामा, तो दिवस जवळ येण्यासाठी तुला प्रार्थना आहे, ‘मला यातून बाहेर काढ.’
५. ‘हनुमंताप्रमाणे स्वतःच्या हृदयमंदिरात श्रीराम आहे’, असे जाणवणे आणि श्रीरामाच्या चरणांची दासी होण्यातच आनंद वाटणे
हे लिहितांना माझ्या डोळ्यांतून अश्रूधारा वहात आहेत. तुझ्या चरणांजवळ येण्याची मला आस लागली आहे. हनुमानाने छाती भेदून श्रीराम दाखवला, तशाच प्रकारे श्रीरामा, तू माझ्या हृदयमंदिरात आहेस. श्रीरामा, माझी भक्ती वाढवून तूच माझ्याकडून साधना करवून घे. मला तुझ्या चरणांची दासी बनव. तुझ्या चरणांची दासी बनण्यातच मला आनंद आहे. श्रीरामा, तुझ्या या चरणपादुकांचा सोहळा मी डोळे भरून पाहिला. मी तुझ्या चरणी कृतज्ञ आहे.
परात्पर गुरु डॉक्टरांनीच माझ्याकडून हे लिखाण लिहून घेतले. त्याबद्दल मी त्यांच्या चरणी कृतज्ञ आहे.
– कु. महानंदा गिरिधर पाटील, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२९.२.२०२०)
|