दैवी बालसाधकांमध्ये जाणवलेली सेवेची तीव्र तळमळ आणि त्यांचा इंद्रियनिग्रह !

१. खोलीत सेवेसाठी येणार्‍या दैवी युवा साधिकेमध्ये असलेली सेवेची तळमळ !

पू. तनुजा ठाकूर

१ अ. सेवेसाठी खोलीत आलेली दैवी युवा साधिका थकलेली दिसणे, तिने ‘दीपावलीनिमित्त विशेष पदार्थ करण्याच्या सेवेत सहभागी झाल्यामुळे थकले आहे’, असे सांगणे : ‘ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२१ या कालावधीत मी गुरुकृपेने रामनाथी आश्रमात रहात होते. तेव्हा एक दैवी युवा साधिका आमच्या खोलीत सेवेसाठी यायची. नरकचतुर्दशीच्या दिवशी ती खोलीत सेवेसाठी आली, तेव्हा ती थोडीशी थकलेली दिसत होती; म्हणून मी तिला विचारले, ‘‘काय झाले ? आज तू थकलेली का दिसत आहेस ?’’ तेव्हा ती मला म्हणाली, ‘‘आज दीपावलीनिमित्त संध्याकाळच्या प्रसादासाठी विशेष पदार्थ केला आहे. त्या सेवेत मी साहाय्य करत होते; म्हणून मला थोडा थकवा आला आहे.’’

१ आ. ‘सर्व सेवा पूर्ण करूनच प्रसाद ग्रहण करणार’, असे दैवी युवा साधिकेने सांगितल्यावर तिची सेवेची तळमळ आणि इंद्रियनिग्रह याचे कौतुक वाटणे : तेव्हा संध्याकाळचे सव्वापाच वाजले होते. त्या वेळी आम्हा दोघींमध्ये झालेले संभाषण पुढे दिले आहे.

मी : तू प्रसाद घेतलास कि नाही ?

दैवी युवा साधिका : नाही. आधी मी माझी सेवा पूर्ण करीन आणि नंतर प्रसाद घेईन.

मी : का ? तुला भूक लागली नाही कि तुला तो विशेष पदार्थ आवडत नाही ?

दैवी युवा साधिका : मला भूक लागली आहे आणि मला तो पदार्थ पुष्कळ आवडतो; पण आधी मी सर्व सेवा करीन आणि नंतर प्रसाद ग्रहण करीन.

मी : तुझी सेवा संपेपर्यंत तो पदार्थ संपून गेला तर ?

दैवी युवा साधिका : काही हरकत नाही.

तिची सेवेप्रती असलेली तळमळ आणि इंद्रियनिग्रह पाहून माझ्या मनात तिच्याबद्दल फार प्रेम दाटून आले.

१ इ. संतांचे आज्ञापालन करण्यासाठी दैवी युवा साधिकेने दोघींसाठी प्रसाद आणून संतांसह तो ग्रहण करणे आणि तेव्हा तिच्याप्रती पुष्कळ प्रेम वाटून तिला थोडीच सेवा सांगणे : मी सहसा संध्याकाळी चहा किंवा अल्पाहार घेत नाही; म्हणून मी भोजनकक्षात जात नाही. त्या दिवशी तिला आलेला थकवा पाहून मी तिला म्हणाले, ‘‘मला थोडी भूक लागली आहे आणि तो पदार्थ मलाही पुष्कळ आवडतो, तर तू तो पदार्थ माझ्यासाठी आणू शकतेस का ?’’ तेव्हा लगेच प्रसन्नतेने ती प्रसाद आणण्यासाठी जाऊ लागली. मी तिला म्हणाले, ‘‘तुझ्यासाठीही आण. आपण दोघी मिळून येथेच प्रसाद घेऊया.’’ माझ्या आग्रहाखातर तिने स्वतःसाठीही प्रसाद आणला. आम्ही दोघींनीही तो प्रसाद खोलीत ग्रहण केला. ती माझ्या या कृतीविषयी कृतज्ञता व्यक्त करत होती; मात्र तिचे साधकत्व बघून माझे मातृत्व आणि प्रेम उचंबळून आले. आम्ही प्रसाद ग्रहण केल्यानंतर त्या दिवशी तिला आलेला थकवा पाहून मी तिला थोडीच सेवा करायला सांगितली.

१ इ. दैवी बालिकांची गुणवैशिष्ट्ये कौतुकास्पद वाटणे : या प्रसंगातून आपल्याला दैवी बालकांतील ‘स्वतःच्या क्षमतेपेक्षा अधिक सेवा करणे, स्वतः आवडता पदार्थ सिद्ध करण्यात साहाय्य केले असले, तरी स्वतःच्या मनावर नियंत्रण ठेवून सेवेला प्राधान्य देऊन आधी सेवा पूर्ण करण्याचा विचार करणे, आज्ञापालन करणे’ इत्यादी गुणवैशिष्ट्ये लक्षात येतात.

१ ई. हिंदु राष्ट्र चालवू शकणारी जितेंद्रिय दैवी बालके ! : वरीलप्रमाणे कुणी सामान्य मुलगी करू शकते का ? मला वाटते, ‘प्रौढ साधकही विचार करतील की, ‘थकवा आला आहे, तर आधी प्रसाद ग्रहण करूया. प्रसाद ग्रहण करतांना १० मिनिटे विश्रांती होईल. नंतर आपण पुढील सेवा करू.’ आश्रमात मोठा परिवार असल्याने काही विशिष्ट प्रसंगीच विशेष पदार्थ मोठ्या प्रमाणात बनवले जातात, तरीही ‘या दैवी बालिकांचे इंद्रियांवर इतके नियंत्रण ठेवणे’, हे मला विशेष कौतुकास्पद वाटले. अशी जितेंद्रिय दैवी बालकेच येणारे हिंदु राष्ट्र चालवू शकतात.

त्यादिवशीमला‘भोगभूमी झालेल्या या वसुंधरेला पुन्हा तपोभूमी बनवण्यासाठी प.पू. गुरुदेवांनी अशा दिव्यात्म्यांना या पृथ्वीतलावर जन्माला घातले आहे’, असे प्रकर्षाने जाणवले.’

(क्रमशः)

– पू. तनुजा ठाकूर, संस्थापिका, वैदिक उपासनापीठ

(११.१२.२०२१)

बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.