राज्यातील कोणत्याही शाळेचा वीजपुरवठा खंडित करणार नाही ! – वर्षा गायकवाड, शिक्षणमंत्री
संभाजीनगर – जिल्हा परिषदेसह स्थानिक स्वराज्य संस्था, महापालिका आणि इतर कोणत्याही शाळांचा वीजपुरवठा खंडित केला जाणार नाही, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी १८ एप्रिल या दिवशी येथे दिली. येथील सातारा परिसरातील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत ‘शाळापूर्व सिद्धता अभियान’ मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्याच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.
वर्षा गायकवाड पुढे म्हणाल्या की, शाळांना वीजदेयक भरण्यासाठीची रक्कम देण्यात आली आहे. त्वरित वीजदेयक जोडणी द्यावी, असे सांगण्यात आले आहे. यापुढे असे प्रसंग घडू नयेत; म्हणून ऊर्जा विभाग आणि सरकार मिळून सर्वेक्षणाद्वारे शाळांमध्ये विजेचा योग्य वापर होतो कि नाही ? यावर लक्ष ठेवणार आहेत. अंगणवाडी सेविका, सरपंच, ग्रामसेवक आणि स्थानिक नेते यांचीही मुले शाळेत येण्यासाठी चळवळ उभारावी, असे आवाहनही त्यांनी केले. शैक्षणिक सत्र आणि नवीन प्रवेश यांचा प्रारंभ १५ जून या दिवशी होत असतो; परंतु गेली २ वर्षे कोरोनामुळे विद्यार्थ्यांची हानी झाली आहे. त्यांच्या बौद्धिक आणि मानसिक विकासासाठी प्राथमिक शिक्षणाचा पाया भक्कम अन् मजबूत असला पाहिजे. यासाठी ‘शाळापूर्व सिद्धता अभियान’ राबवण्यात येत आहे.