पू. (श्रीमती) मंदाकिनी डगवार यांची कु. मधुरा भोसले यांना जाणवलेली आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये !
‘काही दिवसांपासून विदर्भातील वर्धा जिल्ह्यात अध्यात्मप्रसारसेवेचे दायित्व सांभाळणाऱ्या सनातनच्या साधिका श्रीमती मंदाकिनी डगवारकाकू या रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात रहाण्यासाठी आल्या आहेत. माझा त्यांच्याशी अधिक संपर्क येत नाही. आश्रमात वावरतांना येता-जाता त्यांच्याशी ३-४ वेळा संपर्क आल्यावर मला त्यांच्या संदर्भात पुढील गुणवैशिष्ट्ये जाणवली.
१. आनंदाची अनुभूती येणे
त्यांच्याकडे पाहिल्यावर आनंदाची अनुभूती येते आणि त्यांच्याकडून पुष्कळ प्रमाणात ईश्वरी चैतन्य प्रक्षेपित होतांना जाणवते.
२. पू. डगवारकाकू यांच्याकडून पुष्कळ प्रमाणात चैतन्य प्रक्षेपित होऊन त्यांच्या संपर्कात येणाऱ्या साधकांच्या मनातील उत्साह पुष्कळ प्रमाणात वाढणे
त्याचप्रमाणे त्यांच्या सहवासात असतांना त्यांच्याकडून प्रक्षेपित झालेल्या चैतन्यामुळे त्यांच्या संपर्कात येणाऱ्या साधकांच्या मनातील उत्साह पुष्कळ प्रमाणात वाढतो. त्यामुळे त्यांच्याकडे पाहिल्यावर सूक्ष्मातून त्यांचा देह न दिसता केवळ पिवळसर रंगाचा दैवी प्रकाश असल्याचे जाणवते.
३. त्यांच्यातील प्रीतीमुळे त्यांच्या सहवासात आईची प्रीती अनुभवण्यास मिळणे आणि त्यांच्याविषयी पुष्कळ जवळीक वाटणे
त्यांच्याकडून पुष्कळ प्रमाणात प्रीतीच्या गुलाबी रंगाच्या लहरी प्रक्षेपित होतांना जाणवतात. त्यामुळे त्यांच्याशी बोलतांना बोलणाऱ्या व्यक्तीला त्यांच्याशी पुष्कळ प्रमाणात जवळीक आणि आपलेपणा वाटतो. त्यांची प्रीती अनुभवत असतांना ‘आईचीच प्रीती अनुभवत आहे’, असे जाणवते.
४. अहं अल्प असणे
‘श्रीमती डगवारकाकू यांचा अहं पुष्कळ अल्प आहे’, असे त्यांच्याकडे पाहिल्यावर आणि त्यांच्याशी बोलतांना जाणवते. त्यांच्यामध्ये ‘विनम्रता आणि सतत शिकण्याच्या स्थितीत रहाणे’, हे गुण आहेत. त्यामुळे ‘त्या प्रसारसेविका असूनही त्या इतरांना शिकवत नसून सतत शिकण्याच्या स्थितीत असतात’, असे जाणवते. ‘शिष्यावस्था’ म्हणजे सतत शिकत रहाणे. त्यांच्याकडे पाहिल्यावर त्या सतत शिष्यभावात असल्याचे जाणवते.
५. मन पुष्कळ निर्मळ असल्याने त्यांचा तोंडवळा पुष्कळ निरागस दिसणे
श्रीमती डगवारकाकू यांचे मन पुष्कळ निर्मळ आहे. त्यामुळे त्यांचा तोंडवळा पुष्कळ निरागस दिसतो आणि त्यांचे हास्यही निर्मळ आहे. त्या जेव्हा साधकांकडे पाहून स्मितहास्य करतात, तेव्हा ‘त्यांच्याकडून चैतन्य आणि आनंद यांच्या लहरींचे प्रक्षेपण होऊन साधकांच्या मनाची निर्मळता वाढत आहे’, असे मला जाणवले.
६. विष्णुस्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती निस्सीम शरणागतभाव आणि कृतज्ञताभाव असणे
श्रीमती डगवारकाकू यांच्या अंत:करणात विष्णुस्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती निस्सीम शरणागतभाव आणि कृतज्ञताभाव आहे. त्यांच्या हृदयात विष्णुस्वरूप परात्पर गुरुमाऊलीचे विष्णुरूप सूक्ष्मातून असल्याचे जाणवते. त्या विष्णुस्वरूप गुरुमाऊलीच्या अखंड अनुसंधानात असल्याचे जाणवते. ‘हे अनुसंधान शब्दातीत असून ते केवळ आनंदानुसंधान आहे’, असे जाणवते. त्यांच्यामध्ये भगवंताविषयीचा व्यक्त भाव अल्प प्रमाणात आणि अव्यक्त भाव अधिक प्रमाणात आहे. त्यामुळे स्थुलातून त्यांची भावजागृती अल्प प्रमाणात होऊन त्यांच्या हृदयातून अव्यक्त भावाच्या निळसर पांढऱ्या रंगाच्या सगुण-निर्गुण स्तरावरील लहरींचे संपूर्ण वातावरणात सतत प्रक्षेपण होते. त्यामुळे त्यांच्या सहवासात असणाऱ्या व्यक्तींचा ईश्वर, देवता किंवा गुरु यांच्याप्रतीचा भाव त्यांच्या प्रकृतीनुसार जागृत होतो. उदा. एखाद्या साधकात श्रीगुरूंप्रती बालकभाव असेल, तर त्या साधकाचा बालकभाव जागृत होतो, एखाद्यात शिष्यभाव असेल, तर त्याचा शिष्यभाव जागृत होतो इत्यादी.
७. कृतज्ञता
‘परात्पर गुरुमाऊली यांच्या कृपेमुळे श्रीमती मंदाकिनी डगवारकाकूंच्या संदर्भातील वरील आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये जाणवली आणि त्यांच्याकडून शिकायला मिळाले’, यासाठी मी श्रीगुरुचरणी पुष्कळ कृतज्ञ आहे.’
– कु. मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१७.२.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |