राजगडाच्या पायथ्याशी शिवकालीन ‘शिवपट्टण वाड्या’चे अवशेष सापडले !
वेल्हे (पुणे) – वेल्हे तालुक्यातील किल्ले राजगडाच्या पायथ्याला पाले खुर्द येथे छत्रपती शिवरायांच्या शिवपट्टण वाडा स्थळाच्या ठिकाणी पुरातत्व विभागाकडून चालू असलेल्या उत्खननात शिवकालीन दर्जेदार बांधकामाचे अवशेष सापडले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या मातोश्री महाराणी सईबाईंच्या समाधी परिसराच्या विकासाच्या उद्घाटनाच्या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खोदकामाला संमती दिल्यानंतर प्रकल्पाला प्रारंभ झाला. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम चालू आहे. जिथे समाधी आणि शिवपट्टण वाडा आहे, त्या पाले खुर्द या गावाला पवार यांनी भेट दिली आणि तिथे त्यांनी भूमीच्या पातळीच्या वर दिसणाऱ्या ऐतिहासिक वास्तूची एक भिंत पाहिली. त्यानंतर पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकल्पासाठी निधी संमत केला आणि फेब्रुवारी २०२२ मध्ये ३ मासांच्या वेळापत्रकानुसार खोदकाम चालू झाले.
वाड्यात छत्रपतींचे अधिक काळ वास्तव्य होते ! – पांडुरंग बलकवडे, इतिहासतज्ञछत्रपती शिवाजी महाराज यांचे सर्वांत अधिक काळ वास्तव्य असलेल्या या वाड्याच्या रचनेचा उल्लेख अनेक ऐतिहासिक लिपिंमध्ये आढळतो. जिल्हा प्रशासनाच्या साहाय्याने आपला राज्य पुरातत्व विभाग शिवपट्टण वाड्याचे अवशेष शोधत आहे, ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. शिवपट्टण वाडा स्थळाच्या उत्खननात शिवकालीन बांधकामाचे अवशेष सापडले आहेत. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार खोदकामात मोठ्या दगडांचा पाया, मातीच्या विटांचे बांधकाम, कांस्य धातूची नाणी, जुन्या मातीच्या भांड्यांचे अवशेष सापडले आहेत. स्वच्छतेचे काम अद्याप चालू असल्याने, राज्य पुरातत्व विभाग निष्कर्षांचा तपशीलवार अहवाल प्रसिद्ध करील. |
वाड्याची रचना आणि अवशेष ओळखण्यासाठी आधुनिक तंत्रांचा वापर ! – विलास वहाणे, पुरातत्व विभाग
राज्य पुरातत्व विभागाचे साहाय्यक संचालक विलास वहाणे म्हणाले की, या प्राचीन वास्तूची माहिती आम्हाला गावकऱ्यांकडून मिळाली. शिवपट्टण वाड्याचा मोठा विस्तार असल्याचे एका भागाच्या उत्खननातून पुढे आले आहे. वाड्याची रचना आणि अवशेष ओळखण्यासाठी आम्ही आधुनिक तंत्रांचा वापर करत आहोत. २५ मीटर रुंद आणि ५० मीटर लांबीचे खोदकाम केल्यावर सध्याची वाड्याची रचना सापडते आणि हे क्षेत्र १ एकरमध्ये पसरलेले आहे. ही जागा गडासमोर डोंगराच्या पायथ्याशी आहे. हा वाडा अनेक हाताखालून गेला असल्याने छत्रपती शिवाजी महाराजांनी तो बांधला होता कि नाही हे दर्शवणारी कोणतीही नोंद सापडत नाही. आम्हाला अनुमाने ८ ते १० नाणी सापडली आहेत; परंतु त्यातील केवळ दोनच नाणी बहामणी काळातील आहेत. सापडलेल्या इतर वस्तूंमध्ये दगडी दिवा, मातीचे भांडे आणि फरशीच्या रचनांचा समावेश आहे. प्राथमिक निरीक्षणावरून वाड्याला तटबंदीची रचना होती, तसेच पूर्वेला मोठे प्रवेशद्वार होते.
प्रकल्पाचा पहिला टप्पा एप्रिलपर्यंत संपेल ! – राजेंद्र कचरे, उपविभागीय अधिकारी, भोर विभाग
भोर विभागाचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे यांनी सांगितले की, आम्ही पुण्याचे जिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख आणि राज्य पुरातत्व विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली प्रस्ताव संमतीसाठी सादर केला आणि हा प्रकल्प राबवण्यासाठी शासनाने निधी संमत केला आहे. पहिला टप्पा एप्रिलपर्यंत संपेल. आम्हाला गावकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. शिवपट्टण वाडा, तसेच शिवरायांच्या महाराणी सईबाई यांच्या समाधीस्थळाच्या परिसरात पर्यटक, तसेच स्थानिक यांना प्रतिबंध करण्यात आला आहे.
(साभार : हिंदुस्थान टाइम्स)