नाशिक पोलिसांनी काढलेल्या सुलतानी फतव्याचा जाहीर निषेध ! – विश्‍व हिंदु परिषद

अजानच्या वेळी हनुमान चालिसा लावण्यावरील बंदीचे प्रकरण

मुंबई – राज्यघटनेने हिंदूंना दिलेल्या उपासनेच्या मानवी अधिकारांची पायमल्ली करणार्‍या नाशिक पोलिसांच्या सुलतानी फतव्याचा जाहीर निषेध करत आहोत, अशी संतप्त प्रतिक्रिया विश्‍व हिंदु परिषदेचे क्षेत्रमंत्री शंकर गायकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे व्यक्त केली आहे. नाशिकमध्ये मशिदीच्या १०० मीटर परिसरात आणि अजानच्या वेळी हनुमान चालिसा लावण्यास पोलीस आयुक्तांनी बंदी घातली आहे. या पार्श्‍वभूमीवर विहिंपने त्याची भूमिका जाहीर केली.

गायकर पुढे म्हणाले की,

१. इस्लामी राष्ट्राप्रमाणे मुसलमानेतरांच्या पूजापद्धतीला विरोध करणारे किंवा त्यात बंधने आणणारे कायदे पोलिसांनी स्वतंत्र हिंदुस्थानात हिंदूंवर थोपवणे अत्यंत निंदनीय आहे. हिंदूंनी पूजा आणि हनुमान चालिसा पठण करण्यासाठी पोलिसांची अनुमती घ्यावी, तसेच अजानच्या वेळा सांभाळून पूजा अन् हनुमान चालिसा पठण करावे ? हा कोणता न्याय ?

२. पोलिसांचे काम न्यायालयाच्या आदेशाची कार्यवाही करणे हे आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अवहेलना करत राज्यघटनेच्या कोणत्या कलमाद्वारे नाशिक पोलिसांनी हा फतवा काढला ?

३. हिंदु समाजाने कोणत्याही धर्मियांच्या पूजापद्धतीला विरोध केलेला नाही. आता विरोध हा अजानला नसून अनधिकृत भोंग्यांद्वारे होणार्‍या ध्वनीप्रदूषणाला आहे. महाराष्ट्र सरकारचा ढिसाळ कारभार, तसेच पोलिसांचा नाकर्तेपणा यांमुळे हिंदु समाजाला ‘अजान विरुद्ध हनुमान चालिसा’ असे टोकाचे पाऊल उचलावे लागत आहे.

४. देशाचा मुसलमान समाज हा नेहमीच ‘संविधान खतरे में है ।’, असा गळा काढत असतो; परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही आपल्या धर्मगुरूंना विचारून त्यांच्या आदेशाप्रमाणे कार्य करू’, असे म्हणणे म्हणजे देशाच्या राज्यघटनेची केलेली घोर निंदाच आहे. कायद्याला पायदळी तुडवणार्‍यांना एक न्याय आणि कायदा मानणार्‍यांवरच सर्व बंधने हे कोणते धोरण ? ‘सद्र्क्षणाय खलनिग्रहणाय ।’ याप्रमाणेच पोलिसांनी अशा समाजकंटकांवर कारवाई करणे अपेक्षित आहे.