सनातन संस्थेमध्ये उच्चशिक्षित लोक सर्वस्वाचा त्याग करून सनातन धर्माच्या उत्थानासाठी सेवारत ! – सतीश महाना, विधानसभा अध्यक्ष, उत्तरप्रदेश
उत्तरप्रदेशचे नवनिर्वाचित विधानसभा अध्यक्ष श्री. सतीश महाना यांचे सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याकडून अभिनंदन !
लक्ष्मणपुरी, १९ एप्रिल (वार्ता.) – सनातन धर्मासाठी सनातन संस्था निःस्वार्थीपणे अखंड कार्यरत आहे. संस्थेमध्ये अनेक उच्चशिक्षित, तसेच डॉक्टर, अधिवक्ता, अभियंता आदी सर्वस्वाचा त्याग करून सनातन धर्माच्या उत्थानासाठी सेवारत आहेत, असे गौरवोद्गार उत्तरप्रदेश राज्याचे नवनिर्वाचित विधानसभा अध्यक्ष श्री. सतीश महाना यांनी काढले. सनातन संस्थेच्या साधिका सौ. प्राची जुवेकर यांनी श्री. महाना यांची भेट घेतली असतांना त्यांनी हे वक्तव्य केले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक संत पू. निलेश सिंगबाळ आणि हिंदु जनजागृती समितीचे उत्तरप्रदेश आणि बिहार राज्य समन्वयक श्री. विश्वनाथ कुलकर्णी हेही उपस्थित होते. या वेळी श्री. महाना यांना सर्वांनी शुभेच्छा दिल्या. पू. निलेश सिंगबाळ यांनी श्री. महाना यांना श्रीकृष्णाची प्रतिमा भेट दिली, तर सौ. प्राची जुवेकर यांनी श्री. महाना यांना सनातनचा ग्रंथ भेट दिला. या प्रसंगी श्री. महाना यांनी पूर्वी गोव्यातील सनातनच्या आश्रम भेट दिली होती. तेव्हा त्यांना आलेले वैशिष्ट्यपूर्ण अनुभव त्यांनी सांगितले.