हिंदु धर्माची महानता जगभर पोचवण्यासाठी अथक प्रयत्न करणारे आणि सहस्रो साधकांचे आधारस्तंभ असलेले परात्पर गुरु डॉ. आठवले !
‘१२.१.२०२१ या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये स्वामी विवेकानंदांचे ‘मला नचिकेतासारखे १०० युवक द्या. मी देशाचे भवितव्य पालटून दाखवतो’, असे वाक्य वाचले. स्वामी विवेकानंदांनी प्रतिकूल परिस्थितीत हिंदु धर्माची महानता जगभर पोचवण्यासाठी अथक प्रयत्न केले. त्यांना अल्पायुष्य (वय ३९ वर्षे) लाभल्याने त्यांचे स्वप्न पूर्ण करता आले नाही.
परात्पर गुरु डॉक्टरांनी दुष्ट प्रवृत्ती आणि अनिष्ट शक्ती यांच्याशी सूक्ष्मातून अथक लढून अन् भगीरथ प्रयत्न करून ११९ नचिकेत (संत) घडवले. परात्पर गुरु डॉक्टर संतांच्या माध्यमातून देशाचे भवितव्य पालटण्याचे शिवधनुष्य सहजगत्या उचलून पूर्णत्वाला नेण्याचे महान कार्य सिद्धीस नेत आहेत. त्यांच्या दैवी कार्याला शतशः भावपूर्ण नमन !
एकदा भावसत्संगात श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी विचारले, ‘‘परम पूज्य नसते, तर काय झाले असते ?’’ तेव्हा जगभरातील साधकांनी एकमुखाने क्षणार्धात सांगितले, ‘‘परात्पर गुरु डॉक्टर आहेत; म्हणून आम्ही आहोत. ते नसते, तर काहीही नसते.’’
परात्पर गुरु डॉक्टर, सहस्रो साधकांचे आधारस्तंभ असलेल्या तुमच्या कोमल चरणी मी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
– श्रीमती गीता प्रभु, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१८.१.२०२१)
वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत. |