ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांनी ‘आगामी भीषण काळात केवळ भगवंताचे नामच तारेल’, याविषयी केलेले मार्गदर्शन !
ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या चरित्रातील एक प्रसंग सध्याच्या परिस्थितीविषयी आणि आगामी भीषण काळाविषयी भाष्य करणारा आहे. तो येथे देत आहोत.
ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांनी आगामी भीषण आपत्काळाविषयी सांगणे आणि भक्तांना त्याविषयी कुतूहल वाटणे
अलिकडे ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज लोकांना सारखे सांगत, ‘सांभाळा रे सांभाळा. या पुढचे दिवस फार वाईट येणार आहेत. कलि फार मातेल, महागाई फार वाढेल, स्वार्थ फार बोकाळेल, अनीतीला जोर चढेल, भगवंताचा विसर पडेल आणि रोगराई पुष्कळ पसरेल.’ सामान्य लोकांना त्यांच्या बोलण्याचे फारसे महत्त्व वाटत नसे; परंतु जे लोक सुशिक्षित होते आणि जे लोक वर्तमानपत्रे वाचत असत, त्यांना त्यांच्या बोलण्याविषयी कुतूहल वाटे. गोंदवल्याला दैनिक ‘केसरी’ नियमित येत असे. ‘केसरी’ आला म्हणजे स्वतः श्री महाराज काही वेळ तो वाचत असत; पण बहुतेक वेळा कुणाला तरी वाचायला सांगून म्हणत, ‘‘बघ रे, त्यात लढाईची बातमी आली आहे का ? किंवा जगात कुठे लढाई चालू झाली का बघ ?’’ अनेक वेळा त्यांचे हे बोलणे ऐकून भाऊसाहेब केतकर एकदा म्हणाले, ‘‘आपण लढाईविषयी नेहमी बोलत असता. खरोखरच लढाई चालू होणार आहे का ?’’ यावर श्री महाराजांनी जे उत्तर दिले, ते पुष्कळ मार्मिक असल्याने विशेषतः सध्याच्या परिस्थितीत लक्षात ठेवणे आवश्यक आहे.
महाराजांनी पुढील काळात होणाऱ्या लढायांमुळे होणारी जीवित आणि वित्त हानी यांविषयी भाकित वर्तवणे
श्री महाराज म्हणाले, ‘‘भाऊसाहेब, पुढे येणारी ५० ते ५५ वर्षे जगाला पुष्कळ तापदायक आहेत. जगात लढाया नेहमीच होत आल्या आहेत. त्यात मनुष्य आणि संपत्ती यांची हानी पुष्कळ झाली; पण या नंतरच्या काळात ज्या लढाया होतील आणि त्यात माणसांची आणि संपत्तीची जी हानी होईल, तिची कल्पना तुम्हा लोकांना देणे आज शक्यच नाही. ‘कौरव-पांडवांची अस्त्रे भयंकर होती’, असे आपण ऐकतो. त्या तोडीची अस्त्रे आज निघतील आणि जगाला जाळून टाकतील. ‘सर्व माणसे अत्यंत स्वार्थी बनतील आणि ‘देहाचे भोग भोगणे अन् एक दिवस मरून जाणे, यात शहाणपणा आहे’, असे ठरेल. दोन पिढ्यांत देशाला स्वराज्य मिळेल; पण त्यानंतर देवाधर्मावर मोठे आघात होऊन भगवंताचे प्रेम टिकवणे कठीण होऊन बसेल. आजपर्यंत कधीही झाला नाही, इतका पुस्तकी ज्ञानाचा प्रसार होईल. ‘आपल्या गुरूला कळले नाही’, असे म्हणणारा शिष्यच मोठी मान्यता पावेल. पैसा हेच जीवित सर्वस्व बनेल. आचारधर्म नाश पावेल आणि खाण्यापिण्याला, लग्न करण्याला, विषयसेवनाला काही धरबंधच रहाणार नाही. इतकेच नव्हे, तर जो संयमाने वागेल, त्याची निंदा होईल. जिकडे तिकडे असमाधान बोकाळेल आणि सामान्य माणसाला सुख लागणार नाही. चिंतेचे साम्राज्य पृथ्वीवर पसरेल आणि जीवनात स्वारस्य न वाटल्यामुळे पुष्कळ लोक आत्महत्या करतील. पुढारीपणाने वागणारी माणसे आपल्या पायरीवरून भ्रष्ट होतील आणि लोकांना भलत्याच मार्गाला लावतील. पुरुषांचे जाऊ द्या; पण स्त्रियांच्या ठिकाणीही श्रद्धा आणि पावित्र्य आढळून येणे कठीण होऊन बसेल.’’
‘येणारा काळ पुष्कळ कठीण असल्याने माणसाने जगाला सुधारण्यापेक्षा भगवंताच्या नामाला घट्ट धरून ठेवावे’, असे गोंदवलेकर महाराज यांनी सांगणे
भाऊसाहेब सांगत की, श्री महाराज या गोष्टी सांगत असतांना ते इतके गंभीर आणि प्रतिभायुक्त दिसत होते की, त्या वेळी उपस्थित असलेल्या ८-१० मंडळींना मोठे आश्चर्य वाटले. सर्वांना असे वाटले की, प्रभु श्रीरामचंद्रांचे गुरु महर्षि वसिष्ठ गोंदवल्याच्या रामरायासमोर जगाचे भवितव्य बोलून दाखवत आहेत. श्री महाराज शेवटी म्हणाले, ‘‘पुढे येणारा काळ पुष्कळ कठीण आणि पूर्वीच्या काळाहूनही कठीण आहे. याचे कारण पूर्वी माणसाची बुद्धी शाबूत होती. आता माणसाची बुद्धीच भ्रष्ट होऊन जाईल. दृश्यापेक्षा सूक्ष्मातील संकट पुष्कळ भयंकर असते. म्हणून या वेळी सर्व साधनांपेक्षा भगवंताच्या नावाचे महत्त्व पुष्कळ आहे. गावात पुष्कळ थंडी पडली, तर ती थंडी नाहीशी करत बसण्यापेक्षा आपण स्वतः बंडी घालतो. त्याचप्रमाणे जगाचा प्रवाह भलत्याच मार्गाने जाऊ लागला असतांना आपल्यासारख्या माणसाने जगाला सुधारण्याच्या भानगडीमध्ये न पडता स्वतः भगवंताच्या नामाला घट्ट धरून ठेवावे. प्रवाहाचा जोर असल्यामुळे काही काळ आपण त्याच्याबरोबर वहावत जाऊ; पण नामाचा आधार असल्यामुळे आपण बुडणार नाही, हे खास समजावे. सर्वांनी नाम घ्यावे आणि आनंदात रहावे. राम सर्वांना सांभाळील.’’ इतके बोलून श्री महाराज थांबले.
(साभार : सामाजिक संकेतस्थळ)