वाचक आणि जिज्ञासू यांनी अनुभवलेला ‘सनातन आश्रम’ !

वर्धापनदिनाच्या निमित्ताने आश्रमात आलेल्या जिज्ञासूंनी उत्स्फूर्तपणे अभिप्राय व्यक्त केले. आश्रमातील सेवांच्या विविमगध कक्षांत वाचकांना जे जाणवले, ते येथे मांडण्याचा प्रयत्न करत आहोत.

गोवा येथील सनातनचा रामनाथी आश्रम

१. वाचकांनी अनुभवले आश्रमातील बुद्धीअगम्य दैवी पालट

सनातनच्या आश्रमात पंचतत्त्वांचे प्रमाण वृद्धींगत झाल्यामुळे अनेक बुद्धीअगम्य पालट झाले आहेत. अनेक वाचकांना आश्रमातील विविध कक्षांमध्ये सुगंधाची अनुभूती आली. सुगंध येणे, ही पृथ्वीतत्त्वाची अनुभूती आहे. आश्रमातील वायुतत्त्व वाढल्यामुळे ‘आश्रमातील भिंतींवर तळहात ठेवून २ मिनिटे निरीक्षण केल्यास भिंती श्‍वासोच्छ्वास करत आहेत’, असे जाणवते. आश्रमात आलेले वाचक आणि जिज्ञासू यांच्याकडून असे प्रयोग करवून घेण्यात आले. अनेक वाचकांना भिंतींमधील जिवंतपणा अनुभवता आला. वाचकांना आश्रमातील बुद्धीअगम्य दैवी पालट लक्षात येणे, हे त्यांच्या साधनेचे फलित आहे, हे निश्‍चित !

श्री. वीरेंद्र मराठे

२. अन्नपूर्णा कक्षातील स्वच्छता आणि टापटीपपणा घरीही कृतीत आणण्याचा वाचकांचा मानस !

आश्रमातील अन्नपूर्णा कक्षात गेल्यानंतर बहुतांश सर्वच वाचकांनी तेथील स्वच्छता, टापटीपपणा यांचे कौतुक केले. अल्प मनुष्यबळात अधिक जणांचा स्वयंपाक होण्यासाठी वापरली जाणारी आधुनिक यंत्रे, वाफेवर अन्न शिजवण्याची व्यवस्था हेही जिज्ञासूंना विशेष भावले. अन्नपूर्णा कक्षातील स्वच्छता आणि शांतपणे चालू असलेल्या सेवा पाहून ‘हे स्वयंपाकघर आहे, असे वाटतच नाही’, असे काही वाचकांनी सांगितले. ‘अशाच प्रकारे घरीही सर्व करण्याचा प्रयत्न करू’, असा मानस काही वाचकांनी व्यक्त केला.

३. साधकांनी स्वभावदोष निर्मूलन आणि अहं निर्मूलन यांसाठी फलकावर चुका लिहिणे कौतुकास्पद !

आश्रमातील साधक स्वतःतील स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनासाठी प्रयत्न म्हणून भोजनकक्षातील फलकावर स्वतःकडून झालेल्या चुका प्रांजळपणे लिहितात. अनेक वाचकांना त्याचे पुष्कळ कौतुक वाटले. ‘अशा प्रकारे प्रयत्न करायला हवेत’, असे अनेकांनी व्यक्त केले.

४. कलेच्या सात्त्विक सादरीकरणाला वाचकांची दाद !

कलेचे सात्त्विक सादरीकरणही अनेक वाचकांना आवडले. ‘ईश्‍वरप्राप्तीसाठी कला’, हे ध्येय ठेवून कलाकृती सिद्ध करत असतांना होणारी प्रक्रिया, रांगोळी, मेहंदी आदी कलांचे सात्त्विक सादरीकरण, देवतांच्या चित्रांमध्ये त्यांचे तत्त्व येण्यासाठी केले जाणारे प्रयत्न आदींविषयी वाचकांनी जिज्ञासूपणे जाणून घेतले. तसेच या कार्याप्रती आदरही व्यक्त केला.

५. वाचकांना उच्च अनुभूती देणारे सनातन आश्रमातील ध्यानमंदिर !

आश्रमातील ध्यानमंदिरातही वाचकांना विविध अनुभूती आल्या. थोडा वेळ नामजप केल्यानंतर पुढील आश्रमदर्शनासाठी विचारले असता एका जिज्ञासू महिलेने सांगितले की, ‘ध्यानमंदिरातून बाहेर यावेसेच वाटत नाही. ‘नामजप करत राहूया’, असे वाटते.’

६. आधुनिक यंत्रणा असलेले ‘सनातन कलामंदिर’ अद्वितीय !

आश्रमातील चित्रीकरण कक्ष असलेले ‘सनातन कलामंदिर’ पाहून सर्वच विस्मयचकित होतात. एका आध्यात्मिक संस्थेचा असा भव्य आणि आधुनिक यंत्रसामुग्रीने सुसज्ज असलेला चित्रीकरण कक्ष सर्वांना भावतो. या चित्रीकरण कक्षात कोणतेही मनोरंजनाचे कार्यक्रम नाहीत, तर केवळ धर्मशिक्षण देणारे व्हिडिओ, चित्रीकरण आदी केले जाते, हेही वाचकांना अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण वाटते !

७. परात्पर गुरु डॉ. आठवले यांची विविधांगी ग्रंथसंपदा पाहून त्याविषयीची माहिती वाचकांनी आवडीने जाणून घेतली.

८. धर्मजागृती करणारे फलकांचे प्रदर्शन, सात्त्विक उत्पादनांचे प्रदर्शन यांनाही वाचकांचा भरभरून प्रतिसाद लाभला.

– श्री. वीरेंद्र मराठे, व्यवस्थापकीय विश्‍वस्त, सनातन संस्था.