तुर्कस्तानकडून इराकमधील कुर्दिश बंडखोरांवर आक्रमण

इस्तंबूल (तुर्कस्तान) – तुर्कस्तानने इराकच्या उत्तर भागातील कुर्दिस्तानमध्ये आक्रमण चालू केले आहे. तुर्कस्तानचे संरक्षणमंत्री हुलुसी अकर यांनी म्हटले की, लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर्स आणि ड्रोन यांच्याद्वारे कुर्दिश बंडखोरांवर आक्रमण केले जात आहे. त्यांच्या तळांवर, शस्त्रागारांवर आक्रमणे केली जात आहेत. या बंडखोरांनी उत्तर इराकमध्ये त्यांचा जम बसवला आहे आणि तेथून ते आमच्यावर आक्रमण करण्याचा प्रयत्न करत आहेत.

इराक, सीरिया आणि अर्मेनिया येथे मिळून कुर्दिश लोकांची संख्या साडेतीन कोटी पर्यंत आहे. त्यांना त्यांचा स्वतंत्र देश हवा आहे. त्यासाठी ते सशस्त्र आंदोलन करत आहेत. ‘पीकेके’ ही त्यांची संघटना आहे. तिला अमेरिका आणि युरोप यांनी ‘आतंकवादी संघटना’ घोषित केले आहे.