मराठवाडा येथे तरुणांशी विवाह केल्यानंतर पत्नी दागिन्यांसह पळून जाण्याच्या १५ दिवसांत ४ घटना !
लुटेरी दुल्हनसह टोळीचे कृत्य !
जालना – तरुणांशी विवाह करून फसवणूक करणाऱ्या टोळीने गेल्या काही वर्षांत अनेक कुटुंबांना गंडा घातला आहे. पोलिसांच्या हाती लागू नये म्हणून, तसेच अन्वेषण भरकटवण्यासाठी नवरीसह टोळीतील बनावट आई, वडील, काका आणि मामा हे देहली येथील आधार क्रमांक वापरून त्यांची छायाचित्रे त्या ठिकाणी लावून बनावट नावे टाकत त्या ‘आधार’चा वापर करत आहेत. विवाह झाल्यानंतर नोटरी करून देणारे अधिवक्ता आधार क्रमांक आणि नाव पडताळून विवाह बंधपत्र (नोटरी) करत नसल्यामुळेही बनावट विवाहांमध्ये वाढ झाली आहे, असे निरीक्षण तज्ञांनी वर्तवले आहे. मराठवाड्यातील जालना, बीड, खुलताबाद आणि संभाजीनगर या ठिकाणी ४ घटना घडल्याने ‘लुटेरी दुल्हन’चा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे.
गावोगावी अनेक तरुण विवाहविना आहेत. याचाच लाभ घेत फसवणुकीच्या घटना प्रचंड वाढल्या आहेत. विवाहानंतर काही दिवसांतच नवविवाहिता रोख रक्कम आणि दागिने घेऊन पसार होत असून पुन्हा काही दिवसांत दुसरे सावज शोधून त्याला जाळ्यात ओढत असल्याचे समोर आले आहे. यात अनेक कुटुंबियांची फसवणूक होत आहे. परराज्यातील आधार कार्ड घ्यायचे, या आधार कार्डचा क्रमांक तोच राहू द्यायचा आणि पत्ता अन् छायाचित्राच्या ठिकाणी स्वतःचे छायाचित्र टाकून बनावट आधार कार्ड विवाह जमण्याच्या ठिकाणी, तसेच नोटरीच्या वेळी द्यायचे, असे आरोपींकडून केले जात आहे.
अनोळखी मध्यस्थीकडून विवाह जुळवू नका !
‘फसवणुकीचे अनेक प्रकार घडत आहेत. विवाह जुळवतांना मध्यस्थी नवीन असेल, तर त्याची चौकशी करावी. स्थळ जमत असतांना त्या गावात ते किती वर्षांपासून रहातात, त्यांचे नातेवाईक कोण आहेत ? याची चौकशी करावी. घाई गडबडीत विवाह करू नये. काही संशयास्पद वाटल्यास पोलिसांशी संपर्क साधा.’- विनायक देशमुख, पोलीस अधीक्षक, जालना.