उन्हाळ्यात पाण्यासाठी संभाजीनगरवासियांचे हाल : अनेक ठिकाणी ५ ते ७ दिवसांनी मिळते पाणी !

दायित्वशून्य प्रशासन ! स्वातंत्र्यानंतरच्या ७४ वर्षांनंतरची हीच का प्रगती ? – संपादक

संभाजीनगर, १७ एप्रिल (वार्ता.) – जिल्ह्यातील सर्वच जलाशयांमध्ये पाण्याचा मुबलक प्रमाणात साठा असतांना संभाजीनगर शहरात अनेक उपनगरांत सध्या ५ ते ७ दिवसांनी पिण्याचे पाणी येते. पाण्यासाठी नागरिकांना वणवण करावी लागत असून शहरात ठिकठिकाणी पाण्यासाठी आंदोलन होत आहे. १६ एप्रिल या दिवशी नवनाथनगर येथे नागरिकांनी रिकामे हंडे घेऊन रस्त्यावर येऊन प्रशासनाचा निषेध केला. महापालिका पाण्याची अन्य कोणतीही व्यवस्था करत नसल्याने नागरिकांना टँकरने पाणी विकत घ्यावे लागत आहे. ६ दिवसांनी पाणी येत असल्यामुले नागरिकांना ६ दिवस पुरवून वापरावे लागत आहे.

गेल्याच आठवड्यात सिडको, हडको भागांत नागरिकांनी आयुक्तांच्या निवासस्थानाबाहेर पाण्यासाठी मोर्चा काढला होता. नागरिकांनी त्यांच्या भागात अत्यंत अपुरा आणि अल्प दाबाने पाणीपुरवठा होतो, तसेच येणारे पाणीही अस्वच्छ असते, असा आरोप केला होता. महापालिका आयुक्तांनी ‘यावर आम्ही मार्ग काढू, असे आश्वासन दिले होते’; मात्र ८ दिवसांनंतरही यामध्ये काही सुधारणा झालेली नाही.

हडकोवासियांनी एकमेकांना ‘टॉयलेट पेपर’ देत केले पाण्यासाठी आंदोलन !

संभाजीनगर – अनियमित आणि अल्प दाबाने पाणी येत असल्याने शहरातील हडकोवासियांनी महानगरपालिकेचा निषेध व्यक्त केला आहे. लहान मुलांपासून ज्येष्ठ व्यक्तींनी ‘टॉयलेट पेपर’ने एकमेकांचा सत्कार करून, तसेच ढोल-ताशे वाजवत महानगरपालिका पाणीपुरवठा विभागाचा निषेध केला. आगामी काळात निवडणुकीत मत मागण्यासाठी येणाऱ्या उमेदवारांना दारात उभे करणार नाही, अशी चेतावणी संतप्त  महिलांनी दिली. हडको एन्.-११ परिसरातील नवनाथनगर येथे पाणीटंचाईमुळे त्रस्त नागरिकांनी १६ एप्रिल या दिवशी महापालिकेच्या विरोधात आंदोलन केले.

या वेळी आंदोलकांनी महानगरपालिका प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांच्या विरोधात घोषणा दिल्या. गेल्या १५ वर्षांपासून या भागात पाण्याच्या टाकीसाठी केवळ कॉलम उभे केले; परंतु आतापर्यंत टाकी बांधण्यात आली नाही. ८-१० दिवसांनी अल्प दाबाने पाणीपुरवठा होतो. पाणी प्रश्न सुटला नाही, तर १८ एप्रिल या दिवशी महापालिका मुख्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, अशी चेतावणी येथील नागरिकांनी दिली. (पाणी समस्या न सोडवणारे असंवेदनशील प्रशासन काय कामाचे ?  जनतेचा संयम संपण्यापूर्वी पाणी समस्या  सोडवावी.  – संपादक)