वारकऱ्यांची गैरसोय टाळा !
पंढरपूरची वारी म्हणजे वारकरी आणि भाविक यांच्यासाठी भक्तीचा अमूल्य ठेवाच ! कोरोनाचा संसर्ग न्यून झाल्यानंतर १२ एप्रिल २०२२ या दिवशी चैत्र एकादशीचा सोहळा पंढरपूर (जिल्हा सोलापूर) येथे मोठ्या उत्साहात पार पडला. कोरोना संसर्गामुळे मागील २ वर्षे पंढरपूर येथे कोणतीही यात्रा भरली नाही. त्यामुळे यंदा भाविकांचा उत्साहही पुष्कळ होता. हिंदु नववर्षातील पहिली यात्रा आणि ४ वारींपैकी एक असलेली चैत्र वारी, अशा महत्त्वाच्या वारीसाठी महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यातून अनुमाने २ लाख भाविकांनी पंढरपूर येथे येऊन श्री विठ्ठलाचे दर्शन घेतले. चैत्र वारीला एवढ्या मोठ्या प्रमाणात भाविकांची उपस्थिती असेल, याचा कदाचित् विचारच न झाल्याने ‘श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती’ आणि प्रशासन यांच्या नियोजनाचा अभाव नेहमीप्रमाणे दिसून आला.
मंदिराच्या परिसरात पिण्याच्या पाण्याची पुरेशी सोय नाही; मात्र तेथे मंदिर समितीने पाण्याची सोय केलेली नव्हती. पंढरपूर शहरामध्ये मंदिर समितीने ठिकठिकाणी बसवलेले ‘वॉटर टँक’ उन्हाळा चालू होऊनही बंद स्थितीत आहेत. मंदिरामध्ये भाविकांना पायाला चटके बसू नयेत, यासाठी प्रतिवर्षी कारपेट घालण्यात येते; मात्र यंदा ते एकादशी झाल्यानंतर घालण्यात आले. वारीला होणारी गर्दी पहाता त्या कालावधीत काही ठिकाणचे अतिक्रमण हटवण्यात येते; पण यंदा तेही हटवलेले नव्हते. वारकऱ्यांनी मागणी केल्यानंतर चंद्रभागा नदीमध्ये पाणी सोडण्यात आले. एकूणच चैत्र वारीच्या दृष्टीने मंदिर समिती आणि प्रशासन थंड होते कि काय ? असा प्रश्न सामान्य जनतेला पडल्यास नवल वाटायला नको. दळणवळण बंदीच्या काळात शहरात कोणत्याही भाविकाने प्रवेश करू नये, यासाठी आठवणीने मठांना नोटीस बजावणारे प्रशासन वारीसारख्या महत्त्वाच्या उत्सवाच्या वेळी मात्र कुठे गायब होते ? असे कुणाला वाटल्यास चुकीचे काय ?
मंदिराचा गाभारा फळे आणि फुले यांनी सजवण्यासमवेत वारीची परंपरा खंडित होऊ नये, यासाठी जिवाचा आटापिटा करणारे वारकरी अन् भाविक यांना कोणतीही असुविधा होऊ नये, याची मंदिर समितीने चोखपणे व्यवस्था करणे अपेक्षित होते. १० जुलै या दिवशी आषाढी वारी आहे. एक मास आधीपासूनच वारकरी पायी पंढरपूरकडे प्रस्थान करतील, त्यामुळे पालखी मार्गांसह सर्वच ठिकाणी भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाने नियोजनबद्ध कृती कराव्यात, तसेच मंदिर समितीने श्री विठ्ठलाचे भावपूर्ण दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांचा विचार सर्वप्रथम करावा, हीच भाविकांची अपेक्षा !
– वर्षा कुलकर्णी, सोलापूर