चैत्र पौर्णिमेच्या निमित्ताने श्री येडेश्वरीदेवीचे मंदिर लाखो भाविकांनी गजबजले !
येरमाळा (जिल्हा धाराशिव) – श्री तुळजाभवानीदेवीची थोरली बहीण म्हणून परिचित असलेल्या येडेश्वरीदेवीच्या चैत्रातील ५ दिवसांच्या यात्रेला चैत्र पौर्णिमेपासून मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. देवीच्या दर्शनासाठी आणि देवीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्यासाठी ‘आई राजा उदो उदो’चा जयघोष करत मुख्य मंदिराचा परिसर भाविकांच्या गर्दीने व्यापून गेला होता. महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश, कर्नाटक येथून यात्रेच्या पहिल्या दिवशी ३ लाख भाविक आले होते.
यात्रेचा ‘चुनखडी’ वेचण्याचा मुख्य कार्यक्रम १७ एप्रिल या दिवशी मोठ्या उत्साहात पार पडला.
चुनखडी वेचणे म्हणजे काय ?
चुना वेचण्याच्या दिवशी देवीची पालखी मुख्य मंदिरातून सकाळी ८ वाजता निघून १० वाजता चुन्याच्या शेतात, म्हणजे जिल्हा परिषदेच्या पाठीमागच्या बाजूस असलेल्या शेतात येते. येथे पालखीचे आगमन होताच चुनखडीचे खडे आपोआप प्रगट होतात; अन्य वेळी हे खडे न्यून प्रमाणात असतात. यात्रेला आलेला प्रत्येक भक्त चुन्याच्या शेतात जाऊन चुनखडीचे ५ खडे वेचून देवीच्या पालखीवर उधळून पालखीला नैवेद्य दाखवतो.
तुळजापूर (जिल्हा धाराशिव) येथे चैत्र पौर्णिमेनिमित्त दर्शनासाठी भाविकांची गर्दी !
तुळजापूर (जिल्हा धाराशिव) – कुलस्वामिनी श्री तुळजाभवानीदेवीची वर्षातील दुरसी सर्वात मोठी चैत्र पौर्णिमा १६ एप्रिल या दिवशी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. भाविकांच्या माहितीसाठी दिशादर्शक, तसेच सूचना फलक लावले नसल्याने दर्शन रांग शोधतांना त्यांची तारांबळ उडाली होती. परिणामी सहस्रो भाविकांनी महाद्वारासमोरच पायरीचे दर्शन घेतले. उन्हाच्या कडाक्यातही भाविक हलगीच्या तालावर वाजत गाजत मंदिरात दर्शनासाठी आले होते. सायंकाळी अभिषेक पूजेनंतर रात्री उशीरा चैत्र पौर्णिमेची छबिना मिरवणूक काढण्यात आली.