पू. अशोक पात्रीकर यांचा साधनाप्रवास वाचून अमरावती येथील सौ. अनुभूती टवलारे यांना शिकायला मिळालेली सूत्रे
२१ आणि २२ मार्च २०२२ या दिवशीच्या दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये पू. अशोक पात्रीकर यांच्या साधनाप्रवासाच्या संदर्भातील लेख प्रसिद्ध झाला. तो वाचून अमरावती येथील साधिका सौ. अनुभूती टवलारे यांना शिकायला मिळालेली सूत्रे आणि त्यांचे झालेले चिंतन येथे दिले आहे.
१. ऐकण्याची वृत्ती असणे
एकदा उत्तरदायी साधकांनी सेवेविषयी विचारल्यावर पू. पात्रीकरकाका म्हणाले, ‘‘नंतर सांगतो.’’ तेव्हा कुटुंबियांनी त्यांना जाणीव करून देत सांगितले, ‘कोणत्याही सेवेला ‘नाही’ म्हणायचे नसते. तुम्ही ‘हो’ म्हणा.’ तेव्हा मनात कोणताही विचार न आणता त्यांनी सेवेला होकार दिला. सामान्यपणे घरातील पुरुष इतरांचा विचार करत नाहीत; परंतु ‘पू. काका कौटुंबिक जीवनातसुद्धा आदर्शच वागत असत’, हे लक्षात येते.
२. ईश्वरेच्छेने वागणे
पू. काकांची वाहन चालवण्याची बालपणापासूनची इच्छा होती. वाहनचालक सेवेसाठी नाव देऊनही त्यांना सनातन प्रभातच्या संपादकीय विभागात सेवा देण्यात आली, तरीही त्यांनी त्या सेवेला होकार दिला. यातून ‘त्यांनी स्वेच्छेला महत्त्व दिले नाही’, हे लक्षात आले.
३. सकारात्मक राहून प्रयत्न करणे
जळगाव येथे असतांना ‘संतांनी त्यांना साधनेतील प्रयत्न अल्प असल्याची रागावून जाणीव करून दिली’, असा उल्लेख त्यांच्या लेखात आहे. त्या प्रसंगातही त्यांनी त्यावर उपाय शोधले आणि तसे प्रयत्न केले. इतर साधकांचा आदर्श ठेवून प्रार्थना अन् स्वयंसूचना सत्रे केली. याउलट आम्ही साधक ‘सगळे आम्हालाच रागावतात’, असा नकारात्मक विचार करतो.
४. मनात चुकांची भीती असूनही प्रयत्न चालू ठेवणे
गोवा येथे दैनिक ‘सनातन प्रभात’च्या सेवेसाठी गेल्यावर पू. काकांना प.पू. गुरुदेवांचा (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा) सत्संग लाभला. तेव्हा त्यांच्या मनात ‘गुरुदेव माझ्या चुका सांगतील का ?’, अशी भीती होती, तरीही त्यांनी ‘सत्संगांना बसणे, चुका सांगणे, इतरांचे ऐकून घेणे’, हे प्रयत्न चालूच ठेवले. आम्हाला ज्या गोष्टीची भीती वाटते, त्यापासून आम्ही दूर रहाण्याचा प्रयत्न करतो.
५. साधनेची शिकवण पू. काकांच्या अंतर्मनात बिंबलेली असणे
अनेक प्रसंगांत वेगवेगळ्या संतांनी त्यांना जी काही शिकवण दिली, त्या सर्वांची नोंद लेखात आहे, उदा. व्यष्टीसाठी भाव, समष्टीसाठी प्रेमभाव. यावरून ‘अनेक वर्षांपूर्वी दिलेली शिकवण ते अजूनही विसरलेले नाहीत. त्यांनी ती अंतर्मनात बिंबवली आहे’, हे शिकायला मिळाले.
‘साधनेत प्रगतीसाठी संघर्ष करावा लागतो, हे माहिती होतेच; परंतु मनाचा निश्चय ठाम असला, तर तो संघर्ष सोपा होऊन आपण जलद प्रगती करू शकतो’, हे पू. काकांच्या साधनाप्रवासातून शिकायला मिळाले. या लेखाच्या माध्यमातून माझ्या मनाला ऊर्जा मिळाली; म्हणून पू. काका आणि प.पू. गुरुदेव यांच्या चरणी कृतज्ञता !
– सौ. अनुभूती टवलारे (वय ३६ वर्षे), अमरावती (२३.३.२०२२)