हिंदूंवरील अन्याय, अत्याचार आणि हिंसा यांच्या घटनांची माहिती देऊन हिंदु समाजात जागृती घडवून आणणारे एकमेव दैनिक ‘सनातन प्रभात’ ! – प्रा. सुभाष वेलिंगकर, निमंत्रक, हिंदू रक्षा महाआघाडी, गोवा.

प्रा. सुभाष वेलिंगकर, निमंत्रक, हिंदू रक्षा महाआघाडी

गेली ६० वर्षे मी हिंदूसंघटन क्षेत्रात, ५५ वर्षे राष्ट्रीय स्वयंसेवक संघात आणि गेली ४ वर्षे ‘भारतमाता की जय संघ, गोवा’च्या कार्यात आहे. या कालावधीत देशभरातच नव्हे, तर जगभरात हिंदूंवरील अन्याय, अत्याचार आणि हिंसा यांच्या घटनांची माहिती देऊन हिंदु समाजात जागृती घडवून आणणारे एकही दैनिक माझ्या वाचनात आले नाही. सुदैवाने सनातनच्या पणजीस्थित साधकांनी मला दैनिक ‘सनातन प्रभात’शी जोडले. मी खरेतर त्यांच्या ऋणात आहे. माझ्या हिंदु समाजाची चाललेली ससेहोलपट या दैनिकाने मला जाणवून दिली. गेली ४ वर्षे मी सर्वप्रथम ‘सनातन प्रभात’ हाताळल्यानंतरच अन्य वृत्तपत्रे वाचायला घेतो.

१. ‘सनातन प्रभात’मधील अभ्यासपूर्ण आणि संशोधनावर आधारित लेखांनी, हिंदु धर्म, हिंदु संस्कृती यांसमवेतच हा देश अन् हिंदु समाजाचे लचके तोडू पहाणार्‍या आव्हानांची आणि धोक्यांची माहिती मला दिली. संदर्भासाठी संग्राह्य असलेले साहित्य मला ‘सनातन प्रभात’मध्ये या ‘एकाच ठिकाणी’ लाभू शकले.

२. ‘हिंदु समाजासाठी कार्य करणार्‍या समस्त बंधू-भगिनींनी हे दैनिक आपल्या कार्याचा अविभाज्य भाग करावा’, असे माझे स्पष्ट मत आहे.

३. एका ‘द कश्मीर फाइल्स’ने आपल्याला हिंदूंवरील अत्याचारांचा एक अंश उलगडून दाखवला आणि आपण किती अंतर्मुख अन् भावूक बनलो. गेली २३ वर्षे ‘सनातन प्रभात’ अखंडपणे, समर्पणभावाने हेच पवित्र महान कार्य करत आहे, हे सत्य आहे. याचा प्रत्यक्ष अनुभव समाजाने घेणे अत्यावश्यक वाटते.

४. ‘सनातन प्रभात’ने मला एक विशेष कार्याचा पैलू बहाल केला. माझ्या ‘फेसबूकवरील पोस्ट्स’साठी ‘सनातन प्रभात’मधील वृत्तांचा आणि लिखाणाचा भक्कम आधार मला मिळाला आहे. अनेक गटांमध्ये त्या आधारे चैतन्य आणण्याचे काम सुलभ झाले, असे मी मानतो.
धन्यवाद ‘सनातन प्रभात’ ! ‘आपले हे कार्य फुलो, फळो, अक्षुण्ण राहो’, ही परमेश्‍वराच्या चरणी प्रार्थना !
– प्रा. सुभाष भास्कर वेलिंगकर, पणजी, गोवा.