काव्यपुष्पांची ओंजळ करते तुझ्याच चरणी रिती ।
किती किती देशील देवा घेऊ कसे दोन हाती ।
उदारता पाहूनी तुझी घेण्या दोन हात अपुरे पडती ।। १ ।।
दिलेस ना राणा सामर्थ्य (टीप) ते मी स्वीकारले ।
आविर्भाव हे तुझ्या स्मितहास्यांचे मलाही कळले ।। २ ।।
शस्त्राची ही धार साहण्या (टीप १) दिलीस तू सहनशीलता ।
मौनाचे काय सामर्थ्य कळण्या दिलीस ना अंतर्मुखता ।। ३ ।।
धनाचे ते भांडार भरलेस पाहिलेस समाधान हे ।
सहचर किती सुंदर लाभला सकारात्मतेचा हा ।। ४ ।।
पावित्र्याने भरलीस झोळी ही निर्दोषतेची ।
सुंदरता ही दिलीस देवा तूच साधेपणाची ।। ५ ।।
शब्दांचे संपले भांडार वाणीने मौन स्वीकारले ।
देवप्रीतीच्या या कृपेत तन-मन अवघे न्हाले ।। ६ ।।
या काव्यपुष्पांची ओंजळ करते रिती तुझ्याच चरणी ।
तुझ्या चरणस्पर्शाने सुखावूनी धन्य झाली ही धरणी ।। ७ ।।
आला पहा तो वसंत ऋतु घेऊनी पुष्पे अगणित ।
प्रतिदिनी आरती करते कोकिळा मधुर वाणीत ।। ८ ।।
ऐक ना ही गाज सागर जलाची ।
तुला नमन करण्या साद गोड गीताची ।। ९ ।।
मधुर फळाने तरू नमले तुज पुढती ।
म्हणती ते तुला ये ना रे देवा पर्वतावरती ।। १० ।।
तुझ्या करस्पर्शासाठी झाले पहा ते अधीर ।
कशास देसी देवा त्यांना आत बसुनी धीर ।। ११ ।।
अवेळी हा पाऊस आला जन उगाच वदले ।
तुझा मुखचंद्रमा पहाण्यास आभाळ झुकले ।। १२ ।।
टीप – प्रारब्ध सहन करण्याचे सामर्थ्य
टीप १ – सहन करणे
– कृष्णपुष्प (पुष्पांजली) (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के) , बेळगाव (७.३.२०२२)
या कवितेत प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |