‘दिवाण हाऊसिंग फायनान्स’ची १ सहस्र ५७ कोटी रुपयांची फसवणूक !
४ बांधकाम व्यावसायिक आस्थापने आणि त्यांचे संचालक यांसह ९ जणांविरोधात गुन्हा नोंद
मुंबई – दिवाण हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडची (डी.एच्.एफ.एल्.) १ सहस्र ५७ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने ४ बांधकाम व्यावसायिक आस्थापने आणि त्यांचे संचालक यांसह ९ जणांविरोधात निर्मलनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे.
‘आरोपी संचालकांनी त्यांची मालमत्ता गहाण ठेवून वर्ष २०११ ते २०१८ या काळात दिवाण हाऊसिंगकडून कर्ज घेतले होते. आरोपींनी कर्जाची रक्कम इतर बँकांची कर्जे फेडण्यासाठी वापरली. दिवाण हाऊसिंगची अनुमती न घेता गहाण ठेवलेली मालमत्ता विकून कर्ज कराराच्या अटींचा भंग केला’, असे पोलिसांनी सांगितले.
आरोपींनी नाना चौकातील एका निवासी प्रकल्पातील ९ सदनिका दिवाण हाऊसिंगची पूर्वअनुमती किंवा ना हरकत न घेता ५ जणांना विकल्या. एकूण ७९३ कोटी रुपयांच्या कर्जाच्या रकमेपैकी ४६२ कोटी रुपयांची परतफेड करण्यात आली आहे. व्याज जोडून एकूण १ सहस्र ५७ कोटी रुपये येणे बाकी असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.