मराठी भाषेच्या संवर्धनाकरता लोकसहभागाची आवश्यकता ! – सुभाष देसाई, भाषामंत्री
पुणे – राज्यातील सर्व भाषांच्या शाळांमध्ये मराठीची सक्ती, दुकानांवरील मराठी भाषेतील पाट्या, तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कामकाजात मराठीचा वापर प्रभावीपणे व्हावा यांसाठी कायदा केला. आगामी काळात दैनंदिन कामकाजात मराठीचा उपयोग वाढवण्यासाठी सर्व नगरपालिका आणि महामंडळ प्राधिकरणात कार्यशाळा घेतली जाईल. तसेच मराठी भाषेच्या संवर्धनासाठी लोकसहभागाची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन भाषामंत्री सुभाष देसाई यांनी केले. ते मराठी भाषा विभागांतर्गत राज्य मराठी विकास संस्थेच्या नियामक मंडळाच्या नवनिर्वाचित सदस्यांची ‘सह्याद्री’ अतिथीगृह येथे नुकत्याच झालेल्या बैठकीच्या वेळी बोलत होते. ‘मराठी भाषा विभागाचे उपक्रम जगातील मराठी वाचकांपर्यंत पोचवण्यासाठी नियतकालिक प्रकाशित करण्याची आवश्यकता आहे. या वर्षी मराठी भाषा भवनचे स्वप्न पूर्ण होत आहे’, असे सुभाष देसाई यांनी सांगितले.