दैनिक ‘सनातन प्रभात’चा २३ वा वर्धापनदिन उत्साहपूर्ण आणि चैतन्यमय वातावरणात साजरा !
सनातन आश्रमभेटीत वाचक, विज्ञापनदाते आणि हितचिंतक यांनी दिल्या भरभरून शुभेच्छा !
रामनाथी (गोवा), १७ एप्रिल (वार्ता.) – चैतन्यमय वातावरण, साधकांच्या मुखावर ओसंडून वाहणारा आनंद आणि वाचकांनी फुलून गेलेला सनातन आश्रम अशा अत्यंत उत्साहवर्धक वातावरणात दैनिक ‘सनातन प्रभात’च्या गोवा आणि सिंधुदुर्ग आवृत्तीचा २३ वा वर्धापनदिन सोहळा पार पडला. रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमात सकाळी ‘सनातन प्रभात’चे उपसंपादक ६६ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. उमेश नाईक यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वर्धापनदिन विशेषांकाचे पूजन केले. या वेळी ‘सनातन प्रभात’ नियतकालिक समूहाचे माजी संपादक पू. पृथ्वीराज हजारे यांच्यासह ‘सनातन प्रभात’ची सेवा करणारे साधक उपस्थित होते.
पू. पृथ्वीराज हजारे यांच्या शुभहस्ते वर्धापनदिन विशेषांकाचे प्रकाशनही करण्यात आले. वर्धापनदिनाच्या निमित्ताने मान्यवरांसह ६२५ हून अधिक वाचक, विज्ञापनदाते आणि हितचिंतक यांनी सनातनच्या आश्रमाला भेट देऊन संपादकांना शुभेच्छा दिल्या अन् आश्रमातील राष्ट्र आणि धर्म यांविषयीचे कार्य जाणून घेतले.