इंग्लंड येथील एस्.एस्.आर्.एफ्.ची साधिका कु. अॅलिस स्वेरदा हिने बालहनुमानाचे काढलेले सूक्ष्म ज्ञानाविषयीचे चित्र
इंग्लंड येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीची एस्.एस्.आर्.एफ्.ची साधिका कु. ॲलिस स्वेरदा (वय २४ वर्षे) हिने बालहनुमानाचे काढलेले सूक्ष्म ज्ञानाविषयीचे चित्र
अहिंदु असूनही देवतेचे रूप अनुभवणार्या इंग्लंड येथील कु. ॲलिस स्वेरदा !‘इंग्लंड येथील कु. ॲलिस स्वेरदा या गेले काही वर्षे ‘स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशन’ (SSRF) या संस्थेच्या माध्यमातून साधना करत आहेत. गेली काही वर्षे त्या रामनाथी (गोवा) येथील महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या ‘अध्यात्म संशोधन केंद्रा’त राहून साधना करतात. त्या मूळ हिंदु धर्मीय नाहीत, तसेच त्यांचा हिंदु धर्माविषयी विशेष अभ्यासही नाही. असे असतांनाही त्यांना सनातन आश्रमात होणार्या यज्ञ-यागांच्या वेळी त्या त्या देवतेचे रूप दिसते. त्यांनी रेखाटलेले त्या त्या देवतेचे चित्र अत्यंत सुबक असते. ॲलिस विदेशातील असूनही त्यांना देवतेचे रूप अनुभवता येणे कल्पनातीत आहे. कु. ॲलिस यांच्या उदाहरणावरून एखाद्या साधकाला सूक्ष्म-दृष्टी कशी असू शकते, हे कळते ! अहिंदु असूनही यज्ञ विधींच्या वेळी देवतेचे रूप सूक्ष्मातून अनुभवणार्या कु. ॲलिस यांचे कौतुक करावे तेवढे थोडे !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१९.१०.२०२१) |
‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या अध्यात्म संशोधन केंद्रानजीक हनुमानाचे मंदिर आहे. २३.१०.२०२१ या दिवशी मी हनुमानाच्या मंदिराजवळून जातांना ‘भूमी कंप पावत आहे’, असे मला जाणवले. जेव्हा मी मंदिराकडे पाहिले, तेव्हा मला मंदिरावर बालहनुमानाचे विराट रूप दिसले. हनुमान त्याच्या हातांच्या मुठीने भूमीवर जोर देत असल्याने भूमी कंप पावत होती. मला दिसलेल्या बालहनुमानाच्या रूपाचे चित्र रेखाटतांना चित्रांतील विविध भागांचा भावार्थ पुढे दिला आहे.
चित्रातील विविध भागांचा भावार्थ
१. नाकपुड्या : यापूर्वी मी कधीच हनुमानाच्या मुखाचे चित्र रेखाटले नव्हते; मात्र आता हनुमानाचे मुख काढतांना देवाने मला ‘नाकपुड्या रूंद काढ’, असा विचार दिला. नंतर सहज जेव्हा मी माकडाचे चित्र पाहिले, तेव्हा वानराच्या नाकपुड्या रूंद असल्याचे माझ्या लक्षात आले.
२. मंदिर : चित्रात हनुमानाचे मुख रेखाटल्यावर मी ‘चित्रात अधिकाधिक चांगली शक्ती (स्पंदने) येण्यासाठी काय करू ?’, याचा विचार करत होते. त्या वेळी देवाने मला ‘चित्रात हनुमानाचे मंदिर रेखाटल्यास चित्रात अधिकाधिक चांगली शक्ती (स्पंदने) येईल’, असा विचार दिला. अध्यात्म संशोधन केंद्रानजीक असलेल्या या हनुमानाच्या मंदिराचे दार नेहमी बंद असते. त्यामुळे मला आरंभी ‘चित्रात मंदिराचे दार बंद दाखवूया’, असा विचार आला. नंतर मला लक्षात आले की, ‘मी मंदिराचे दार उघडलेले दाखवले, तर साधकांना हनुमानाच्या मूर्तीचे दर्शन होईल आणि त्यांची भावजागृती होईल.’ मला यातून ‘देव आणि भक्त यांच्यात कोणताच पडदा नसल्याचे हे प्रतीक आहे’, असे जाणवले.
३. मुकुट : मी देवाला प्रार्थना केल्यावर मला ‘हनुमानाचा मुकुट कसा रेखाटावा’, हे सूक्ष्मातून दिसले. मुकुटाच्या मध्यभागी सप्तकोनी आकाराचा हिरा असून ‘हा मुकुट सूर्यदेवतेशी संबधित आहे’, असे मला जाणवले. जसे ज्योतिषशास्त्रात सात ग्रह आहेत, तसे मुकुटातील हिर्याला सात बाजू आहेत आणि त्या ७ ग्रहांच्या प्रतीक आहेत. मुकुटावरील पानांची नक्षी म्हणजे निसर्गातील झाडे-झुडुपे यांचे प्रतीक असून ती (झाडे-झुडुपे) नेहमी सूर्याच्या दिशेने वाढत असतात.
४. सूर्य : मुकुटातून सूर्याचे किरण प्रक्षेपित होत असल्याचे मला सूक्ष्मातून दिसले. मला दिसलेले बालहनुमानाचे रूप ‘सूर्यदेवतेशी संबधित आहे’, असे मला जाणवले; कारण बालहनुमानाने ‘सूर्य म्हणजे कोणते तरी फळ आहे’, असे समजून ते घेण्यासाठी सूर्याकडे झेप घेतली होती. (टीप १)
(टीप १ : ‘हनुमानाचा पुढील श्लोक आहे.
महारुद्र अवतार हा सूर्यवंशी । अनादिनाथ पूर्ण तारावयासी ।।
असा चैत्री पौर्णिमेचा जन्म झाला । नमस्कार माझा तया मारुतीला ।।
अर्थ : हनुमंत हा सूर्यवंशी असून तो महारुद्राचा अवतार आहे, भक्तांना तारण्यासाठी आलेला भगवान शिवाचाच अवतार आहे. ज्याचा जन्म चैत्र पौर्णिमेला झाला, अशा मारुतीरायाला माझा नमस्कार असो.
वरील श्लोकात हनुमंत हा सूर्यवंशी असल्याचा उल्लेख आहे. त्याचप्रमाणे बालहनुमान सूर्याकडे झेप घेतांना इंद्राने त्याचे वज्र हनुमानाच्या दिशेने सोडले होते. वज्राच्या प्रहाराने बालहनुमान बेशुद्ध झाला होता. त्या वेळी सूर्यदेवाने त्याला ‘मी माझे एक शतांश तेज हनुमंताला देतो’, असा आशीर्वाद दिला होता. ॲलिसला सूर्याच्या त्याच तेजाचे किरण मुकुटातून प्रक्षेपित होतांना दिसले. यातून कु. ॲलिसचे वैशिष्ट्य लक्षात येते की, हिंदु धर्माविषयी कोणतेही ज्ञान नसतांना तिला हनुमानाचे रूप सूर्यदेवतेशी संबधित असल्याचे जाणवले. त्याचप्रमाणे हिंदु धर्माची महानताही यातून लक्षात येते की, हिंदु धर्म कोणत्याही एका पंथापुरता मर्यादित नसून तो किती व्यापक आहे.’ – संकलक)
५. मंदिराचे प्रतिबिंब : हनुमानाच्या मंदिरासमोरील लाद्यांवर मला मंदिराचे प्रतिबिंब दिसले; परंतु बालहनुमानाचे प्रतिबिंब मात्र दिसले नाही.’
– कु. ॲलिस स्वेरदा, इंग्लंड (१३.४.२०२२) ॐ
(‘मी अन्य एका साधिकेला ‘तुला मंदिराच्या ठिकाणी लाद्यांवर मंदिराचे प्रतिबिंब दिसले का ?’, असे विचारले, तेव्हा तिने प्रतिबिंब दिसत नसल्याचे सांगितले. कु. ॲलिसला मंदिराचे प्रतिबिंब सूक्ष्मातून दिसले. रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात बर्याच ठिकाणी चैतन्य आणि आपतत्त्व यांमुळे लाद्या गुळगुळीत झाल्या असून त्यावर पाणी असल्याप्रमाणे भासते. त्या लाद्यांवर व्यक्ती किंवा वस्तू यांचे प्रतिबिंब दिसते. ‘येणार्या काळात हनुमान मंदिराच्या समोरील लाद्याही अशाच गुळगुळीत होतील आणि त्यावरही असेच प्रतिबिंब दिसू लागेल अन् त्यामुळेच कु. ॲलिसला मंदिराचे प्रतिबिंब सूक्ष्मातून दिसले असावे’, असे मला वाटले.’
– कु. भाविनी कापडिया (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१३.४.२०२२))
लवकरच प्रसिद्ध करत आहोत : अध्यात्म संशोधन केंद्रानजीक असलेल्या मंदिराचे लाद्यांवर प्रतिबिंब दिसणे आणि बालहनुमानाचे प्रतिबिंब न दिसणे, यामागे कु. ॲलिस स्वेरदा हिला ईश्वराकडून मिळालेली उत्तरे
• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. • सूक्ष्म-जगत् : जे स्थूल पंचज्ञानेंद्रियांना (नाक, जीभ, डोळे, त्वचा आणि कान यांना) कळत नाही; परंतु ज्याच्या अस्तित्वाचे ज्ञान साधना करणार्याला होते, त्याला ‘सूक्ष्म-जगत्’ असे संबोधतात. • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात. • सूक्ष्म-ज्ञानाविषयीचे चित्र : काही साधकांना एखाद्या विषयासंबंधी जे जाणवते आणि अंतर्दृष्टीने जे दिसते, त्यासंबंधी त्यांनी कागदावर रेखाटलेल्या चित्राला ‘सूक्ष्म-ज्ञानाविषयीचे चित्र’ असे म्हणतात. • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |