‘हिंदुत्व’ हा शब्द तुम्ही पूजापद्धतीशी जोडू नका ! – चंद्रकांत पाटील, भाजप

पुणे – ‘हिंदु’ हा शब्द आचार आणि व्यवहार यांच्याशी जोडलेला आहे, तसेच ‘हिंदुत्व’ हा शब्द तुम्ही पूजापद्धतीशी जोडू नका. राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही तो ‘पूजापद्धती’शी अभिप्रेत नाही. हिंदूंमध्येही कुणी गणपतीला मानतो, तर कुणी देवीला मानतो; पण त्यांचा व्यवहार हा दुसऱ्याला मोठे करण्यात आनंद मानणे, दुसऱ्याचे न ओरबाडणे, असा आहे. हिंदु राष्ट्राचा विचार केला, तर ज्या ज्या ठिकाणी हिंदु संस्कृती होती तेथे आजही मंदिरे आहेत, आजही हिंदु विचार पद्धतीप्रमाणे जीवनपद्धती आहे. आता या सर्वांना भारताच्या राजकीय नेतृत्वाखाली आणण्याची कल्पना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची नाही, तसेच इतकी शक्ती वाढवावी की, त्याचा वापरच करण्याची आवश्यकता भासू नये, असा सरसंघचालकांच्या म्हणण्याचा अर्थ असून त्यांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ कुणी काढू नये, असे भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी ‘पुढील १५ वर्षांमध्ये ‘अखंड भारत’ होईल. हिंदु राष्ट्र हाच सनातन धर्म आहे’, या केलेल्या विधानावर पाटील यांनी ‘मोहन भागवत यांच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ लावू नका’, असे सांगत वरील प्रतिक्रिया दिली.