हसन मुश्रीफ यांच्या विरोधात समरजितसिंह घाटगे यांची तक्रार प्रविष्ट करून घेण्यास कागल पोलिसांचा नकार !
हसन मुश्रीफ यांनी विज्ञापनामध्ये प्रभु श्रीरामचंद्रांचा एकेरी उल्लेख केल्याचा आरोप !
कागल (जिल्हा कोल्हापूर) – ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त ‘गोकूळ दूध संघा’कडून देण्यात आलेल्या विज्ञापनामध्ये प्रभु श्रीरामचंद्रांचे नाव अयोग्य पद्धतीने छापण्यात आले आहे. या विज्ञापनामध्ये प्रभु श्रीरामचंद्रांचा एकेरी उल्लेख करण्यात आला आहे. याच्या निषेधार्थ मुश्रीफ यांच्याविरोधात तक्रार प्रविष्ट करण्यासाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्या पुढाकाराने श्रीराम भक्तांनी भव्य मोर्चा काढला होता; मात्र पोलिसांनी तक्रार प्रविष्ट करून घेण्यास नकार दिल्याचे घाटगे यांनी सांगितले. (हिंदूंवर गुन्हा नोंद करण्यास तत्परता दाखवणारे पोलीस हिंदूंच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करतात, हे लक्षात घ्या ! – संपादक)
(सौजन्य : Zee 24 Taas)
या वेळी रामनवमीला मुश्रीफ यांचा जन्म झाल्याची माहिती खोटी असून त्यांनी ४० वर्षे जनतेची फसवणूक केली आहे. २४ मार्च १९५४ या दिवशी रामनवमी नव्हती. श्रीरामाची थट्टा बहुजन समाज खपवून घेणार नाही. या वेळी माजी नगरसेवक सत्यजित कदम, माजी महापौर सुनील कदम हेही उपस्थित होते.
(सौजन्य : Live 24 Tas News)
गोकूळ दूध संघाच्या संचालकांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, जाहिरातीवरून काही जणांनी विनाकारण घाणेरडे राजकारण करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणामुळे मंत्री मुश्रीफ यांना जो मनस्ताप झाला त्याविषयी आणि या जाहिरातीमुळे कुणाच्या भावना दुखावल्या असल्यास आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. या प्रसिद्धीपत्रकावर अध्यक्ष विश्वास पाटील यांच्यासह संचालकांची नावे आहेत.