गडचिरोली येथे नक्षलवाद्यांकडून दोघांची हत्या !
संपूर्ण नक्षलवाद नष्ट केल्याविना अशा घटना संपणार नाहीत, हे लोकप्रतिनिधींच्या लक्षात कसे येत नाही ? संपूर्ण नक्षलवाद संपवण्याच्या दृष्टीने सरकारने ठोस कृती करावी ! – संपादक
गडचिरोली – जिल्ह्यातील बहुप्रतीक्षित सुरजागड लोह प्रकल्पस्थळी १३ एप्रिल या दिवशी जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते २ सहस्र युवकांना रोजगार नियुक्तीपत्र देण्यात आले. या कार्यक्रमाला १२ घंटे उलटत नाही, तोच स्थानिक २ नागरिकांची नक्षलवाद्यांनी दगडाने ठेचून हत्या केली. १४ एप्रिल या दिवशी हेडरी पोलीस उपविभागीय क्षेत्रात गट्टा पोलीस साहाय्य केंद्राअंतर्गत ही घटना घडली आहे.
यातील एक ग्रामस्थ दलसू हिचामी याची झारेवाडा येथे पोलीस खबरी असल्याच्या संशयावरून, तर दुसरा आत्मसमर्पित नक्षली नवीन नरोटे याची गोलगुट्टा येथे हत्या करण्यात आली आहे. ते दोघेही स्वतःच्या घरी झोपलेले असतांना रात्री नक्षलवादी गावात आले. त्यांनी दोघांना उचलून गावाबाहेर नेले. दुसऱ्या दिवशी सकाळी त्या दोघांचेही मृतदेह रस्त्यावर आढळून आले. या घटनेनंतर नक्षल शोधकामी अधिक पोलीस कुमक रवाना करण्यात आली आहे.