जर युक्रेनने रशियाची युद्धनौका बुडवली असेल, तर ‘तिसर्या महायुद्धाला प्रारंभ’ झाला !
रशियाच्या सरकारी वृत्तवाहिनीचा दावा !
मॉस्को (रशिया) – रशियाची युद्धनौका ‘मोस्क्वा’ काळ्या समुद्रात क्षेपणास्त्र डागून बुडवल्याचा दावा युक्रेनने केल्यानंतर रशिया संतप्त झाल्याचे सांगण्यात येत आहे. युक्रेनच्या ओडेसा किनार्याजवळ दोन वेळा या युद्धनौकेवर क्षेपणास्त्रे डागण्यात आली. त्यानंतर मोठा स्फोट झाल्याचे युक्रेनच्या अधिकार्यांचे म्हणणे आहे. या दाव्यानंतर रशियाच्या ‘रशिया १’ या अधिकृत सरकारी वृत्तवाहिनीने ‘युद्धनौकेविषयी युक्रेनने केलेला दावा खरा असेल, तर आता तिसरे महायुद्ध चालू झाले आहे’, असे म्हणायला काहीच हरकत नाही’, असे वाहिनीच्या सूत्रसंचालिका ओल्गा कार्बेयेवा हिने स्पष्टपणे नमूद केले. ‘आता आपण ‘नाटो’शी (‘नॉर्थ अॅटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन’शी) जरी नाही, तरी त्याने युक्रेनला दिलेल्या शस्त्रास्त्रांशी निश्चितच लढत आहोत’, असेही ती म्हणाली.
दुसरीकडे रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने दावा केला आहे की, मोस्क्वा युद्धनौका युक्रेनच्या आक्रमणात उद्ध्वस्त झालेली नाही, तर तांत्रिक बिघाडामुळे या युद्धनौकेवर आगीचा भडका उडाला आणि या युद्धनौकेला जलसमाधी मिळाली.’