आजीवन ब्रह्मचारी रहाण्याचे व्रत घेतलेल्या मारुतिरायाने विद्यार्जनासाठी विवाह करणे
‘आपल्याला अन्य देवांसारखा मारुति त्याच्या पत्नीच्या समवेत कधीच दिसत नाही. तो एकटाच असतो. आपल्याला त्याला त्याच्या पत्नीच्या समवेत पहायचे असेल, तर आंध्रप्रदेशातील खम्माम या जिल्ह्यात मारुतीचे एक प्राचीन मंदिर आहे. ते एकमेव मंदिर आहे, जिथे मारुति आपल्या पत्नीच्या समवेत आहे.
अशी आख्यायिका आहे की, मारुति त्याचे गुरु सूर्यदेव यांच्याकडून विद्या शिकत होता. सूर्यदेवांनी ९ विद्यांपैकी ५ विद्या त्याला शिकवल्या; पण शेष राहिलेल्या ४ विद्या शिकण्यासाठी त्याला विवाहित असणे आवश्यक होते. (तशी अटच होती.) हे ऐकून आजीवन ब्रह्मचारी रहाण्याचे व्रत घेतलेला मारुति बेचैन झाला. शिष्याची द्विधा मनस्थिती पाहून सूर्यदेव त्याला म्हणाले, ‘‘तू माझ्या मुलीशी विवाह कर.’’ सूर्यदेवाची मुलगी सुवर्चला मोठी तपस्विनी होती. मारुतीच्या समवेत विवाह करून सुवर्चला पुन्हा तपस्येला निघून गेली. अशा प्रकारे मारुतीने विवाहाची अट पूर्ण केली आणि ब्रह्मचारी रहाण्याचे व्रतही पाळले. मारुतीच्या या विवाहाचा उल्लेख पराशर संहितेमध्ये आहे. ‘विवाहित जोडप्याने खम्माम या ठिकाणी येऊन सपत्नीक मारुतीचे दर्शन घेतले, तर त्या दांपत्यामध्ये प्रेम, सुख आणि शांती नांदते’, अशी धारणा आहे.’
(साभार : सामाजिक संकेतस्थळ)