राज्यातील वीजनिर्मिती केंद्रांची माहिती घोषित करावी ! – विवेक वेलणकर, सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष
राज्यातील ९ वीजनिर्मिती केंद्रे अन्य कारणांमुळे बंद
पुणे – कोळशाअभावी अपुर्या वीजनिर्मितीमुळे भारनियमनाची वेळ आल्याचा दावा महावितरणकडून केला जात असतांना, ‘महापारेषण’च्या राज्य भार प्रेषण केंद्राच्या (स्टेट लोड डिस्पॅच सेंटर) संकेतस्थळावर कोळशाच्या तुटवड्यामुळे एकही वीजनिर्मिती केंद्र बंद नसल्याची माहिती समोर आली आहे. कोळशाच्या तुटवड्यामुळे एकही वीजनिर्मिती केंद्र बंद नसून, ९ वीजनिर्मिती केंद्रे अन्य कारणांमुळे बंद असल्याने १ सहस्र ८४१ मेगावॅट वीजनिर्मिती ठप्प असल्याविषयी महावितरण आणि महानिर्मिती यांनी खुलासा करावा; तसेच कोणती वीजनिर्मिती केंद्रे चालू असूनही अल्प क्षमतेने वीजनिर्मिती करत आहेत आणि कोणती वीजनिर्मिती केंद्रे विजेच्या मागणीअभावी बंद आहेत, याची माहिती घोषित करावी, याविषयी मौन का बाळगले जात आहे ? याचा खुलासा करण्याविषयी महावितरण आणि महानिर्मिती यांच्या व्यवस्थापकीय संचालकांना ‘सजग नागरिक मंचा’चे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी निवेदन दिले आहे. त्यासह राज्य भार प्रेषण केंद्राच्या संकेतस्थळावरील अहवाल जोडला आहे.
त्यामध्ये राज्यातील कोणती वीजनिर्मिती केंद्रे कधीपासून, कोणत्या कारणांसाठी बंद आहेत ? याविषयीची माहिती आहे. या अहवालात आज वापरात असलेले आणि ज्यांचे वीज खरेदी करार अस्तित्वात आहेत, अशा वीजनिर्मिती केंद्रांपैकी ९ वीजनिर्मिती केंद्रे बंद असल्याचे नमूद आहे.
अहवालात नमूद असलेली अन्य सूत्रे
१. उरण येथील एकूण ३२८ मेगावॅटची ३ वीज केंद्रे गॅसच्या तुटवड्यामुळे बंद आहेत, तर १०८ मेगावॅट क्षमतेचे एक केंद्र ‘टर्बाइन ब्लेड’’या समस्येमुळे बंद आहे.
२. तारापूर येथील १६० मेगावॅट क्षमतेची २ केंद्रे (एकूण ३२० मेगावॅट) तांत्रिक कारणांमुळे जवळपास २ वर्षांपासून बंद असून, आणखी एक वर्ष चालू होणार नाही.
३. घाटघर येथील १२५ मेगावॅट क्षमतेचे जलविद्युत् केंद्र तांत्रिक बिघाडामुळे २ मासांपासून बंद आहे.
४. कोराडी येथील ६६० मेगावॅट क्षमतेचे औष्णिक वीजनिर्मिती केंद्र एक आठवड्यापासून तांत्रिक बिघाडामुळे बंद आहे, तर ‘जे.एस्.डब्ल्यू.’ या खासगी उद्योगाचे ३०० मेगावॅट क्षमतेचे औष्णिक वीजनिर्मिती केंद्र १ मासापासून तांत्रिक बिघाडामुळे बंद आहे.