आयुक्त नेमून मंदिर आणि मशीद परिसराचे चित्रीकरण करा !

काशी विश्‍वनाथ मंदिराच्या परिसरात असलेल्या वादग्रस्त ज्ञानवापी मशिदीच्या  प्रकरणी वाराणसी न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश

वाराणसी (उत्तरप्रदेश) – येथील काशी विश्‍वनाथ मंदिराच्या परिसरात असलेल्या वादग्रस्त ज्ञानवापी मशिदीच्या प्रकरणी वाराणसी न्यायालयाने आयुक्त नेमण्याचा आदेश दिला आहे. तसेच ‘१९ एप्रिल या दिवशी हे आयुक्त मंदिर-मशीद परिसराचा दौरा करून त्याचे चित्रीकरण करतील’, असाही आदेश दिला आहे. या काळात येथे पोलीस बंदोबस्त ठेवण्यासही न्यायालयाने सांगितले आहे. सध्या या मशीद परिसरात दिवसभरात ५ वेळा नमाजपठण केले जात आहे. या मशिदीचे संचालन अंजुमन ए इंतजामिया कमेटीकडून केले जात आहे. याचिकाकर्त्यांनी या परिसराचे सर्वेक्षण, रडारद्वारे निरीक्षण, तसेच चित्रीकरण करण्याची मागणी केली होती.

सप्टेंबर २०२० मध्ये ही याचिका प्रविष्ट करण्यात आली आहे. ‘येथे काशी विश्‍वनाथ मंदिर पाडून तेथे ज्ञानवापी मशीद बांधण्यात आली आहे. येथे पूर्वी श्रुंगार गौरीदेवीची पूजा केली जात होती. आता मुसलमानांनी मशीद परिसर हिंदूंच्या कह्यात दिला पाहिजे’, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात काशी विश्‍वनाथ मंदिर ट्रस्टकडून कोणताही विरोध करण्यात आला नाही. ट्रस्ट या संदर्भातील कोणत्याही याचिकेमध्ये पक्षकारही नाही. स्वयंभू भगवान विश्‍वेश्‍वर हा तिसरा पक्षकार म्हणून गेल्या ३ दशकांपासून न्यायालयीन लढाई लढत आहे.