राज्यातील १६ उत्पादकांना उत्पादन बंद ठेवण्याचे आदेश !
९५ ॲलोपॅथिक औषधे उत्पादकांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या !
गुणवत्ता आणि निकष यांनुसार ॲलोपॅथिक औषधे सिद्ध न करणाऱ्या औषध उत्पादकांकडून हीन दर्जाची औषधांची विक्री होत असतांना अन्न आणि औषध झोपले होते का ? आतापर्यंत अशी घातक औषधे पुरवून या उत्पादकांनी नागरिकांचे आरोग्य धोक्यात घातले आहे. त्यामुळे दोषी उत्पादकांवर कठोर कारवाई व्हायला हवी. – संपादक
नागपूर – अन्न आणि औषध प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेल्या पडताळणीनंतर गुणवत्ता अन् निकष यांनुसार उत्पादने होत नसल्याने राज्यातील ९५ ॲलोपॅथिक औषधे उत्पादकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे, तसेच १६ उत्पादकांना उत्पादन बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
अन्न आणि औषध प्रशासनाच्या वतीने राज्यात औषधे अन् सौंदर्य प्रसाधने कायदा, १९४० आणि नियम, १९४५ अन्वये औषधे, सौंदर्य प्रसाधने यांचे उत्पादन अन् विक्री यांचे नियमन केले जाते. याअंतर्गत राज्यातील ॲलोपॅथिक औषधे उत्पादन करणाऱ्या आस्थापनांची पडताळणी जानेवारी ते मार्च २०२२ या कालावधीत करण्यात आली. यात कोकण विभाग ३६६, बृहन्मुंबई ५२, पुणे १०४, नाशिक ४३, संभाजीनगर ४७, नागपूर २२ आणि अमरावती विभाग २१, अशा एकूण ६५५ औषधनिर्मिती आस्थापनांची पडताळणी करण्यात आली. या पडताळणी मोहिमेत त्रुटी आढळल्याने ९५ उत्पादकांना ‘कारणे दाखवा’ नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. एकूण १६ प्रकरणांत गंभीर दोष आढळल्याने या संस्थांना पुढील आदेशापर्यंत उत्पादन आणि कामकाज बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. १७ प्रकरणांत सुधारणा करून पूर्तता अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.